ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हेन्टिलेटरच नाही! थोडक्यात बचावली चिमुकली

ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हेन्टिलेटरच नाही! थोडक्यात बचावली चिमुकली

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचं आश्रयस्थान असलेल्या ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी आवश्यक असलेलं व्हेन्टिलेटरच नसल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

11 जानेवारी : ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचं आश्रयस्थान असलेल्या ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी आवश्यक असलेलं व्हेन्टिलेटरच नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे एका मुलीला जीवाला मुकावं लागणार होतं, मात्र तिचा जीव अगदी थोडक्यात बचावला आहे. या प्रकारामुळे हॉस्पिटलमधील अपुऱ्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठाण्यातल्या वज्रेश्वरी भागात राहणाऱ्या गरीब आदिवासी सर्पदंश झालेल्या एका चिमुरडीला ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र याठिकाणी लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरच नसल्यानं सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी तिला मुंबईतल्या जेजे किंवा केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

सर्पदंश झाल्यानं योग्य वेळेत उपचार मिळणं गरजेचं होतं. स्वामी फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे महेश कदम यावेळी काटेला कुटुंबीयांच्या मदतीला अक्षरश: देवासारखे धावून आले. त्यांनी या मुलीला जवळच्याच लाईफ लाईन रुग्णालयात दाखल केलं. आणि तिच्यावर तातडीने उपचारास सुरुवात झाली. नाहीतर सिव्हिल हॉस्पिटलचा सल्ला चिमुरडीच्या जीवावर बेतला असता.

खरं तर ठाणे सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रुग्णांचं आश्रयस्थान. कारण या भागातल्या ग्रामीण जनतेला इतर कुठेही उपचार घेणं परवडत नाही. मात्र या हॉस्पिटलवर अवलंबून राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणारंच ठरतंय. सरकारी हॉस्पिटलमध्ये सोयींचा अभाव आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार महाग. यामुळे इथल्या गोरगरीब जनतेचं मरण स्वस्त झालंय, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही.

First published: January 11, 2018, 9:20 AM IST

ताज्या बातम्या