अजित मांढरे, प्रतिनिधी
ठाणे, 27 मार्च : मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रवेश करण्यास अविनाश जाधव यांना बंदी घालण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्र्यातल्या अवैध मशीद आणि मजारवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला होता. अविनाश जाधव यांच्या या कृतीमुळे मुंब्रामधील कायदा सुव्यवस्था बिघण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, त्यामुळे अविनाश जाधव यांना प्रवेशबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंब्रा शहरातील अनधिकृत दर्गा विषयी मनसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. तसंच या आक्रमक मनसैनिकांनी थेट वनविभाग कार्यालयात धडक देत, वनाधिकाऱ्यांनाच जाब विचारला आहे. मुंब्रादेवी डोंगरावरील अवैध दर्गा कधी जमिनदोस्त करणार ? असला सवाल विचारत, मनसैनिकांनी अल्टिमेटम दिला आहे.
गुढीपाडवाच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदंबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील अवैध मशिदी आणि मजारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
मुंब्रा देवी डोंगरावरील मशीद आणि मजार अवैध असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला… मात्र अजुनही त्यावर कारवाई न झाल्यानं मनसैनिकांनी आक्रमक भुमिका घेतलीये.
माहीम आणि सांगली इथल्या अवैध मशीद आणि मजारींचा मुद्दा उचलत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला इशारा देताच सरकारने कारवाई केली.
यानंतर राज्यभर मनसैनिकांनी अवैध मशिदी आणि मजारींचा मुद्दा लावून धरलाय. ठाण्यातील मुंब्रा देवी डोंगरावरील मशीद आणि मजारीबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांनी याबाबत ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 15 दिवसात जर कारवाई नाही केली तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला.
मात्र यानंतरही प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नाही. दुसरीकडे संबंधित मशीद वैध असल्याचं ठाणे वन विभागाकडून सांगण्यात आल्याची माहिती लक्षात येताच मनसैनिकांनी तात्काळ वन विभागात धडक दिली.
मनसेच्या या धडकेनंतर आमच्यापर्यंत कोणतीच तक्रार आली नसून आता मनसेच्या तक्रारीनंतर सर्वेक्षण करुन कारवाई करु असं उत्तर ठाणे वन विभागानं दिलंय. सध्या रमजानचा महिना सुरु असल्यानं शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी सर्वांचीच भूमिका आहे. मात्र कारवाई झाली नाही तर, मनसेनं मशीदीच्या बाजूला गणेश मंदिर बांधण्याचा इशारा दिलाय, त्यामुळे आता पोलीस आणि प्रशासन काय करणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.