गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची गय नाही, राज्य सरकारने जाहीर केला नवा नियम

गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची गय नाही, राज्य सरकारने जाहीर केला नवा नियम

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गड किल्ल्यांवर गैरवर्तन रोखण्यासाठी नवीन नियमाची घोषणा केली आहे

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. गड किल्ल्यावर जर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना थेट जेलवारी भोगावी लागणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गड किल्ल्यांवर गैरवर्तन रोखण्यासाठी नवीन नियमाची घोषणा केली आहे. गड किल्ल्यावर दारू पिऊन राडा  घालणाऱ्यांना यापुढे सहा महिने सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एकच व्यक्ती जर दुसऱ्यांदाही पुन्हा आढळून आल्यास त्याला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होईल.

गृहमंत्रलयाने याबद्दलचा आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये राज्यात सार्वजनिक दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली असून गड किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना ही शिक्षा लागू होणार आहे.

ज्या ठिकाणी मद्य प्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी जागा वगळता अन्य सार्वजनिक ठिकाणी दारुच्या नशेत गैरवर्तन केल्यास  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 (सन 1949 चा 25) मधील कलम 85 अन्वये शिक्षेबाबतच्या तरतूद करण्यात आली आहे.

महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे यासाठी एक संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, उत्तम संशोधन झाल्यास स्ट्रॉबेरीचा दर्जा आणि उत्पादन वाढेल तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरी पीक घेता येऊ शकेल यावर भर दिला पाहिजे. महाबळेश्वर एक लोकप्रिय ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. साहजिकच वाहनांची समस्या आहे. यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ करून बॅटरी किंवा इलेक्ट्रिक संचलित वाहनांचा उपयोग करता येईल का, हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

महाबळेश्वरप्रमाणे परिसरातील पर्यटन स्थळांचा देखील विकास होणे, ती लोकप्रिय होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी कालबद्ध रीतीने मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील, असंही ते म्हणाले.

First published: February 1, 2020, 9:45 PM IST
Tags: drinkfort

ताज्या बातम्या