मुंबई, 10 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पण 'राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्र हिताची तडजोड होईल असे कोणतेही निर्णय घेणार नाही आणि घेऊ देणार नाही. शाहु-फुले-आंबेडकर विचारांनीच हे राज्य चालेल, असा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो', असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ग्वाही दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन (22nd anniversary of the Nationalist Congress Party) साजरा होत आहे. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी कोरोनाची परिस्थितीत केलेल्या उपाययोजना, राज्य सरकारने केल्या कामांबद्दल माहिती दिली.
कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. कोरोनाशी लढा देत असताना विकासकामं थांबू दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत वेळोवेळी निर्णय घेतले. विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. देशातील परिस्थिती सर्वांनी पाहिली आहे. गंगा नदीत काय परिस्थिती होती हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, असं म्हणत भाजपवर टीका केली.
तुमच्याकडे आहे हे 2 रुपयाचं नाणं तर घरबसल्या कमवा 5 लाख रुपये, वाचा काय आहे ऑफर
तसंच, भाजप विचारांचे सरकार केंद्रात आले आहे. देशात सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे. शासकीय संस्था विकून टाकण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ सुद्धा एकसुराने काम करत आहे. त्यामुळे आपल्याला लढा द्यावा लागणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.
यूपीए सरकार होतं तेव्हा ४०० रुपयांमध्ये सिलेंडर मिळत होते, ते आज ८०० रुपये द्यावे लागत आहे, डिश टीव्ही रिचार्ज जे १०० रुपयांमध्ये येत होते, त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे, बरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, असं म्हणत मोदी सरकारवर अजित पवारांनी टीका केली.
'मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. ओबीसी समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. पण, कोणत्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचे नाही. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. , असंही अजित पवार यांनी सांगितलं.
तुमच्या साबणावर कोरोनाव्हायरस तर नाही ना?
जीएसटीचा परतावा मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांकडे केली आहे. त्याच बरोबर बीडच्या पिक विमा योजना, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणीही केली आहे. त्यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले असून काम करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
संकट किती आली तरीही महाराष्ट्र कधी झुकला नाही, कधी झुकणारही नाही. राज्य सरकारने घेतलेले चांगले निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. राष्ट्रवादीला महाराष्ट्रात १ क्रमांकाचा पक्ष कसा करता येईल हा प्रयत्न आपण करू. पवार साहेबांचे नाव आणि राजकीय वजन आणखी मोठे करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असंही अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Sharad pawar