मुंबई, 16 जानेवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीतही शाब्दिक वाद सुरू झाले आहे. मंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आता नितीन राऊत यांनीही सेनेला इशारा दिला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याला उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कडकडीत उत्तर दिलंय. इंदिरा गांधी आमच्यासाठी पूजनीय आहेत, त्यांच्याबाबत कोणी काहीही बोललं तर खपवून घेणार नाही, अशी जोरदार टीका नितीन राऊत यांनी केली. तसंच, 'हम ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं', असं सणसणीत उत्तर नितीन राऊत यांनी संजय राऊतांना दिलंय.
Nitin Raut, Maharashtra min & Congress leader: Indira Gandhi was our leader & idol. Sanjay Raut used to comment against BJP even when they were a part of govt but if he thinks we'll keep listening like them,then we won't tolerate this.Hum eent ka jawab patthar se dena jaante hain pic.twitter.com/c7z2BaJi18
— ANI (@ANI) January 16, 2020
खपवून घेणार नाही - अशोक चव्हाण
त्याआधी अशोक चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करून संजय राऊत यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधानं केली आहेत. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रृत आहे. त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
तसंच. महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असं आवाहनही चव्हाण यांनी केलं.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत माफिया डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी आक्षेप घेताच अवघ्या दोन तासांत संजय राऊत यांनी दिवंगत इंदिरा गांधींबद्दलचे वक्तव्य मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. याआधी संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले होते.
संजय राऊतांची दिलगिरी..
इंदिरा गांधी या देशाच्या सर्वोच्च नेत्या होता. प्रभावशाली नेत्या, प्रखर राष्ट्राभिमानी नेत्या. आमच्याकडून इंदिरा गांधी यांची प्रतिमा भंग होईल, असे कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शायरने महाराष्ट्राचे मनोरंजन करणे चांगले राहील, अशा शब्दांत संजय निरुपम यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.