S M L
Football World Cup 2018

नौदलाने सीमेवर लढावं, सरकारच्या कामात अडथळा आणू नये -नितीन गडकरी

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2018 06:00 PM IST

नौदलाने सीमेवर लढावं, सरकारच्या कामात अडथळा आणू नये -नितीन गडकरी

11 जानेवारी : नौदलाला विरोध करण्याची सवय झालीये. मलबार हिलमध्ये तरंगत्या हाॅटेलला विरोध करण्याचं कोणतही कारण नसताना नौदलाने विरोध केला, त्यांचं काम सीमेवर लढण्याचं आहे विरोध करण्याचं नाही अशी नाराजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचं भूमीपूजन नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी नितीन गडकरींनी भारतीय नौदल आण सरकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

नौदलाचा काम हे सरकारला विरोध करण्याच नाहीये. तर सीमेवर जाऊन देशाचं संरक्षण करण्याचं आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईत राहायचंय. यासाठी ते माझ्याकडे दक्षिण मुंबईत जागा मिळावी या मागणीसाठी आले होते. पण आम्ही त्यांना एक इंचही जागा देण्यास विरोध केला होता. नौदलाने मलबार हिलमध्ये प्रस्तावित तरंगत्या हाॅटेल प्रकल्पाला विरोध केला. कोर्टाने नकार दिल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागला अशी नाराजी गडकरींनी बोलून दाखवली.

'अधिकारी नीट काम करत नाही'

तसंच माझ्या विभागात पैशांची कमी नाही, पण अधिकारी चांगलं काम करत नाही. अधिकाऱ्यांची सरकारी विचारधारा व्यावसायिक विचारप्रणालीत बदलण्यात जास्त वेळ जातोय. एका तारखेला पगार मिळतोय त्यातच ते सुखी असतात ते कोट्यवधीची स्वप्न पाहु शकत नाही हा त्यांचा दोष नाही अशी खंतही गडकरींनी व्यक्त केली.

'मुंबईत पर्यावरणवाद्याचा विनाकारण विरोध'

मुंबईत काही पर्यावरणवादी विनाकारण विरोध करतात. वरळी-वांद्रे सी लिंकचं काम सुरू होतं. तेव्हाही त्यांनी विरोध केला होता. वृत्तपत्रात रोज लेख लिहिले जात होते. मग एकदा या सर्वांना घेऊन मी खाडीमध्ये वस्तूस्थिती दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो. तेव्हा सगळ्यांनी खाडीच्या वासामुळे नाकं दाबली होती. मी त्यांना म्हटलं नाक दाबू नका, तुम्हाला हा वास कसला येतोय. तर तो समुद्राचा येतोय. मग इथं समुद्र आहे का ?, असा प्रश्न केला तर त्यांनी इथं चिखलं असल्याचं सांगितलं. मग मी त्यांना विचारलं इथं मासे दिसतात का ? तर ते नाही म्हणाले. जर चिखलात मासे नसतील तर मासे मरणार कुठून ? असं सांगितल्यावर वाद मिटला होता असा किस्साही गडकरींना सांगितला.

सगरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2 लाख 41 हजार कोटींची गुंतवणूक

या वर्षी 80 क्रूझ मुंबईत आल्या आणि 5 वर्षात 950 क्रूझ येतील, इथल्याच तरुणांना स्किल डेव्हलपमेंट करून रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सगरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2 लाख 41 हजार कोटींची गुंतवणूक केली अशी माहितीही गडकरींनी दिली.

जेएनपीटीचे कंटेनर भिवंडीत जायचे आणि मग मुंबईत यायचे. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि प्रदूषण व्हायचे. आता हे कंटेनर समुद्रमार्गे येतील आणि वाहतुकीचा प्रश्न सुटेल असंही ते पुढे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close