मुंबई, 25 डिसेंबर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly winter session) सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे पाहून म्याव म्याव आवाज काढून डिवचलं. यानंतर याचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचं पहायला मिळालं. तर, आता राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना खालची पातळी गाठल्याचं दिसत आहे. (Nawab Malik vs Nitesh Rane)
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी एक ट्विट करत 'पहचान कौन' असं म्हटलं. या ट्विटमध्ये त्यांनी एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो वापरला होता. यानंतर आज भाजप आमदार नितेश राणे यांनीही मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आणि त्यावर शिर्षक देत म्हटलं, ही प्रजाती फक्त भंगारात आढळते.
एकमेकांवर टीका टीपण्णी करताना राजकीय नेते आता आपली पातळी सोडून भाष्य करताना दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय परंपरा, संस्कृती नेते विसरत चालले आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाचा : अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळ्याच्या अनावरणाला राज्य सरकारने परवानगी नाकारली?
अधिवेशनात नितेश राणेंच्या 'म्याँव-म्याँव'वरुन घमासान
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून म्याँव-म्याँव असे आवाज काढत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचलं होतं. संबंधित प्रकरण हे काल घडलं होतं. या प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले.
शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधीमंडळाचे प्रधान सचिवांना पत्र लिहून प्राण्यांचे विचित्र आवाज येत असल्यामुळे विधीमंडळाचं सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या बेवारस प्राण्यांची गांभीर्याने पाहणी करुन त्यांचा बंदोबस्त करण्याचा सुरक्षा रक्षकांना आदेश द्यावेत, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली आहे.
वाचा : फोन टॅप प्रकरणाला नवे वळण, सायबर सेलने पाठवली फडणवीसांना चौकशीची प्रश्नावली!
नेमकं प्रकरण काय?
विधानभवाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे आमदार काल (23 डिसेंबर) घोषणाबाजी करत होते. या दरम्यान आदित्य ठाकरे विधान भवनावर पोहोचले. ते विधान भवनात प्रवेश करत असताना पाऱ्यांवर आंदोलन करत असणाऱ्या आमदारांपैकी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून म्याँव-म्याँव असा आवाज काढला. यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या आमदारांमध्ये हशा पिकला. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच घटनेचे पडसाद आज विधानसभा आणि विधान परिषदेत बघायला मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Nawab malik, Nitesh rane