मुंबई, 10 जून : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण, रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोकण दौऱ्यावर मदत घेऊन निघाणार आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उद्या कोकण दौऱ्यावर चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा असणार आहे. या आधी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोकण, रायगड परिसरात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती.
दरम्यान, आज भाजपकडून निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागासाठी मुंबईतून मदत रवाना करण्यात आली आहे.
कोकण दौऱ्यावर चंद्रकांत पाटील Vs जितेंद्र आव्हाड!
शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण पेटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला होता.
'आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावं. जणू काही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत', अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
'जेव्हा कोल्हापूरमध्ये पूर आला तेव्हा भाजपचे नेते कुठे होते, याचा शोध तर घ्यावा. त्याही परिस्थितीमध्ये स्वतः शरद पवार साहेब 2 फूट पाण्यामधून चालत अंगठ्याला जखम असताना देखील गेले. आपल्या 50 वर्षांच्या कारकर्दितीत जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर नाही तर देशावर प्रसंग ओढवला तेव्हा मदतीला धावणारे शरद पवार साहेब आहेत. अगदी गुजरातच्या भुकंपात सुद्धा त्यांनी अभुतपूर्व काम केलं आणि म्हणूनच स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख बनवलं', अशी आठवणच आव्हाडांनी पाटलांना करून दिली.
'आजही सकाळी 8 वाजल्यापासून लोकांना भेटण्याची त्यांची दिनचर्या खंडीत झालेली नाही. म्हणुनच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार साहेबांबद्दल टीका करण्याच्या आधी कमीत-कमी जणाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा', अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केला होती.