Home /News /mumbai /

सर्वात मोठा खुलासा, सचिन वाझेने मुंबईत 'ते' कांड करण्यासाठी थेट दाऊदच्या गुरूची घेतली मदत?

सर्वात मोठा खुलासा, सचिन वाझेने मुंबईत 'ते' कांड करण्यासाठी थेट दाऊदच्या गुरूची घेतली मदत?

सचिन वाझेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या (Underworld Don Dawood Ibrahim) गुरुची मदत घेतली होती, अशी माहिती NIA सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई, 2 एप्रिल : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातून निलंबित करण्यात आलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याच्याबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. कारमायकल रोडवर पार्क करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा संबंध दहशतवादाशी जोडण्याकरता सचिन वाझेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या (Underworld Don Dawood Ibrahim) गुरुची मदत घेतली होती, अशी माहिती NIA सूत्रांकडून मिळाली आहे. गाडीत जिलेटीनच्या कांड्या ठेवून एका नवीन, मात्र बनावट दहशतवादी संघटनेमार्फत घटनेला दहशतवादाची किनार देण्याचा कट सचिन वाझेने आखला होता. ठरल्यानुसार या दाऊदच्या गुरुने त्याचे काम चोखपणे बजावले. मात्र मनसुख हिरेन याची हत्या झाली आणि सचिन वाझेचा डाव आधीच उघडकीस येऊन बनावट दहशतवादी संघटनेचा कटही उघडकीस आलाय. नेमका कसा रचला कट? NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळचा मुंबईतील दाऊदचा गुरु ज्याने दाऊदला अंडरवर्ल्ड दुनियेचा पहिला टप्पा गाठण्यात मदत केली त्या सुभाष सिंग ठाकूरच्या मदतीने सचिन वाझेने बोगस दहशतवादी संघटनेचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे सुभाष सिंग ठाकूर याने सचिन वाझे याच्या सांगण्यावरून एका मध्यस्थीच्या माध्यमातून UAE येथील सर्व्हरवरुन सोशल मीडियावर मेसेज पाठवला होता आणि त्याकरता मोबाईल फोन तिहार जेलमधील इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याच्याकडे पोहोचवण्यात आला. ज्यात UAE चा सर्व्हर सेट करण्यात आला होता. हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी होणार मोठा खुलासा? 9 जणांची समिती करणार चौकशी हा मेसेज पाठवण्याकरता टेलिग्राम या सोशल मीडियावर JAISH-UL-HIND नावाने एक ग्रुप देखील बनवला गेला होता आणि तेहसीन हा या घटनेची जबाबदारी घेईल याची पूर्ण सेटींग करण्यात आली होती. ज्या करता सुभाष सिंग ठाकूर याने महत्वाची भूमिका बजावली. पण मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत या ग्रुपकरता वापरण्यात आलेल्या मोबाईलचे लोकेशन हे तिहार जेलमध्ये आढळून आले होते. त्यानुसार दिल्ली स्पेशल सेलने कारवाई करत 3 मोबाईल आणि काही सिमकार्ड तिहार जेलमधून जप्त केले होते. तसंच इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याची चौकशी देखील केली होती. सुभाष सिंग ठाकूर याच्याशी संपर्क करण्यात एका माजी आणि वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने सचिन वाझेला मदत केली, असा संशय NIA ला आहे. त्यामुळे लवकरच या अधिकाऱ्याची NIA चौकशी करणार असून सुभाष सिंग ठाकूर याची याआधी राज्यातीलच एका तपास यंत्रणेने चौकशी केली आहे. याच तपास यंत्रणेच्या चौकशीला पुढे नेत NIA आता या सुभाष सिंग ठाकूरची पुन्हा चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे. JAISH-UL-HIND नावाने टेलिग्राम या सोशल मीडियावर सुरुवातीला कारमायकल रोडवर ठेवण्यात आलेली गाडीची जबाबदारी आम्ही घेत असून “यह तो अभी ट्रेलर है, पिच्चर अभी बाकी है” असा मेसेज पोस्ट करण्यात आला होता. 24 तासातच याच JAISH-UL-HIND नावाने टेलिग्रामवर पुन्हा मेसेज करुन या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही असा मेसेज करण्यात आला होता. तो कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला होता याचा शोध NIA घेत आहे. हेही वाचा - पुण्यातली धक्कादायक घटना: 14 वर्षं होते प्रेमात; पण लग्नाला नकार दिल्याने प्रियकरानेच डोक्यात दगड घालून केला खून कोण आहे दाऊदचा गुरू? दाऊदच्या सुरुवातीच्या काळात सुभाष सिंग ठाकूर याने दाऊदच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावल्याने सुभाष सिंग ठाकूर अंडरवर्ल्डमध्ये गुरु म्हणून प्रसिद्ध आहे. 1992 साली झालेल्या जेजे कांड प्रकरणात सुभाष सिंग ठाकूरला न्यायालयाने मृत्यूची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर काही कारणास्तव सुभाष सिंग ठाकूरला फतेगढ सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले. त्यानतंर सुभाष सिंग ठाकूरला धमकीच्या गुन्ह्यांत वाराणसी जेलमध्ये ठेवण्यात आले असून या दरम्यान तो BHU हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.. असं सांगितलं जात आहे की सुभाष सिंग ठाकूरने 1993च्या साखळी बॉम्ब स्फोटानंतर दाऊदशी फारकत घेतली. पण या सुभाष सिंग ठाकूरने सचिन वाझेला कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणासाठी मदत केली याबाबत मात्र NIA च्या हाती सध्या काहीच लागलं नाही. ज्यामुळे लवकरच सुभाषसिंग ठाकूरची चौकशी केली जाईल असं NIA अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Dawood ibrahim, Mumbai police, Sachin vaze

पुढील बातम्या