Home /News /mumbai /

'News18 लोकमत वेब'चा इम्पॅक्ट; मुख्यमंत्र्यांकडून दखल, रस्ते गुलाबी करणाऱ्यांवर होणार कारवाई

'News18 लोकमत वेब'चा इम्पॅक्ट; मुख्यमंत्र्यांकडून दखल, रस्ते गुलाबी करणाऱ्यांवर होणार कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

    प्रदीप भणगे, डोंबिवली, 5 फेब्रुवारी : डोंबिवलीत रस्ता गुलाबी झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात तातडीने माहिती घेत अहवाल सादर करण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत काल (बुधवारी) चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली MIDCमध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर केमिकल मुळे एमआयडीसीतला रस्ता गुलाबी रंगाचा झाला. 'News18लोकमत वेबने सर्वात आधी या बातमीला प्रसिद्धी दिली होती. थेट घटनास्थळावरून या घटनेबाबतची माहिती सर्वांसमोर आणली. या बातमीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दखल घेतली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान डोंबिवलीतील गुलाबी रस्त्याच्या प्रकरणावर चर्चा होत मुख्यमंत्री यांनी आदेश दिले आहेत. नक्की काय आहे प्रकरण? डोंबिवलीतील प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीतील रस्त्यांवर गुलाबी रंग दिसत आहे. हा रंग इतरही काही रस्त्यांवर दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचंही पुढे आलं आहे. या केमिकलमुळे मोठ्या प्रमाणात उग्र दर्प सुटला असून डोळे चुरचुरण्याचे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. डोंबिवलीतल्या या प्रदुषणामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावं लागतंय. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर रसायनांचे कारखाने आहे. हे सर्व कारखाने सुरक्षा आणि पर्यावरणांच्या निकषांचं पालन करत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात या आधी झालेले आहे. कधी कारखान्यात स्फोट होणं, कामगारांचा वायूगळतीने मृत्यू होणं अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये कारखान्यात एवढे प्रचंड स्फोट झाले की त्यामुळे सगळा परिसर हादरुन गेला आहे. याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिक करत असतात मात्र तात्पुरत्या मलमपट्टीपलिकडे फारचं काहीच झालं नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत दखल घेतल्याने काय कारवाई करण्यात येते, हे पाहावं लागेल.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Dombiwali, Uddhav thackeray

    पुढील बातम्या