तब्बल 1 कोटी किंमतीचे मांडूळ जप्त, 'या' भयंकर कामासाठी होते विक्री!

तब्बल 1 कोटी किंमतीचे मांडूळ जप्त, 'या' भयंकर कामासाठी होते विक्री!

आरोपीने मांडुळ या दुर्मिळ प्रजातीचा साप चिफ वाईल्ड लाईफ वार्डन यांच्या पूर्व परवानगी शिवाय अवैधरीत्या बाळगला होता

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

वसई,  19 डिसेंबर : तब्बल 1 कोटी किंमत असलेल्या मांडूळची वसईत तस्करी करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे.

वसई महामार्गावरील वसई फाटा इथं एका इसमाकडून मांडुळ जातीचा साप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जप्त केला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई पूर्वेकडील मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वसई फाटा येथे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक इसम दुर्मिळ प्रजातीतील मांडूळ जातीचा साप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती.

पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सापळा रचला असता एक संशयास्पद व्यक्ती आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव आतिक शकील कुरेशी (२९) असून त्याच्याकडे दुर्मिळ जातीचा दुतोंडी मांडूळ जातीचा साप आढळून आला.

या सापाची किंमत जवळपास एक कोटी असल्याचं सांगण्यात आलं. आरोपीने मांडुळ या दुर्मिळ प्रजातीचा साप चिफ वाईल्ड लाईफ वार्डन यांच्या पूर्व परवानगी शिवाय अवैधरीत्या बाळगला होता. याबाबत पोलिसांनी कुरेशी याने हा मांडूळ कुठून आणला आणि त्याची विक्री तो कुणाला करणार होता, याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

काळ्या जादूसाठी वापर

स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखा पालघर आणि वसई युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक कोटी रूपये किंमत असून काळी जादू करण्यासाठी वापरला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सिद्धवा जायभाये यांनी दिली. या मांडूळ सापाची वजनानुसारही किंमत ठरत असल्याची माहितीही समोर आली आहे. अतिकला वसई न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: 1 crore
First Published: Dec 19, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या