आमदार रोहित पवारांची भावनिक FB पोस्ट, शरद पवारांविषयी व्यक्त केल्या भावना!

आमदार रोहित पवारांची भावनिक FB पोस्ट, शरद पवारांविषयी व्यक्त केल्या भावना!

'स्व.यशवंतराव चव्हाण साहेब व आदरणीय पवार साहेब यांनी राजकारणासारख्या क्षेत्रात घातलेल्या पायावरच मी मार्गक्रमण करेन.'

  • Share this:

मुंबई 25 ऑक्टोंबर : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार  रोहित पवार यांनी मतदारांना भावनिक साद घालणारं आवाहन केलंय. Facebookवर एक पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोक जसं कौतुक करतात तसच ते कानही धरतात. त्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग होऊ नये यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिल. लोकांनी जो विश्वास आणि प्रेम व्यक्त केलं त्याचं उतराई होण्याची मी ग्वाही देतो असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीत रोहित पवारांनी राम शिंदे यांचा केलेला पराभव लक्षणीय ठरलाय. कर्जत-जामखेडच्या या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहेरा म्हणून रोहित पवारांना राष्ट्रवादीत पाहिलं जातं. शरद पवारही त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या आवाहनाकडे पाहिलं जातंय.

शेती ते विधानभवन, राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा 'हा' फोटो होतोय व्हायरल!

काय म्हणाले रोहित पवार?

माझ्या नावापुढे लागलेल्या आमदार पदाकडे मी जबाबदारी म्हणून पाहतो. लोक आपल्याकडून ज्या प्रमाणे अपेक्षा ठेवतात त्याच प्रमाणे अपेक्षाभंग झाला तर राग देखील व्यक्त करतात.

आपल्या या जबाबदारीची सुरुवात काल निवडून येताच महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन केली. राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यातून पालख्या पंढरीत येऊन एक होतात आणि सर्वजण मिळून, कोणताही भेदभाव न करता विठ्ठलाच्या चरणी आपला माथा टेकवतात. हाच एकीचा विचार माझ्या समाजकारणात नेहमीच राहिला आहे व येथून पुढे देखील सर्वांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक विकासाचे राजकारण करण्यात येईल.

नवलच...नेता आमदार होण्याचा नवस पूर्ण, कार्यकर्त्याने घातला 18 किलोमीटर दंडवत!

माझे आजोबा पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिस्थळाचे आज सकाळी दर्शन घेऊन त्यांच्याप्रमाणेच शेती आणि शेतकरी, तंत्रज्ञान विकास तसेच शिक्षण, महिला सशक्तीकरणासाठी भरीव काम करण्याचा संकल्प केला. सोबतच आजोबा आदरणीय शरद पवार साहेब व आज्जी प्रतिभाकाकींचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर कराड येथे जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करण्यात आले. मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर देखील स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले होते. हे स्मृतिस्थळ नेहमीच मला सकारात्मक राजकारणाची ऊर्जा देत आले आहे.

राजकारणाची दिशा कोणती असेल असा प्रश्न कोणी विचारला तर मी प्रामाणिकपणे सांगेन की स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा विकास करताना एक रूपरेषा आखली, ग्रामीण शहरी असा कोणताही फरक न करता राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत हा विकास पोहचवला. आदरणीय शरद पवार साहेबांनी हीच विकासाची पद्धत आपल्या कामात अवलंबवली आणि राज्याला प्रगतीची दिशा दिली. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब व आदरणीय पवार साहेब यांनी राजकारणासारख्या क्षेत्रात घातलेल्या पायावरच मी मार्गक्रमण करेन.

असाच सर्वांगीण विकास करण्यासाठी कर्जत जामखेड मधील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच आपल्या या विश्वासाला पात्र राहण्याचे काम इथून पुढे होत राहील याची ग्वाही मी आपणा सर्वांना देतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:59 PM IST

ताज्या बातम्या