मुंबई, 21 डिसेंबर : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये प्रशासनाकडून शिथिलता आणण्यात आली आणि नागरिकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. अशातच काही दिवसांतच 2021 हे नवं वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मात्र अशातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा नियम लागू राहील, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम मुंबईतही पाहायला मिळेल. राजधानी मुंबईत नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यात येतं. यासाठी अनेकजण आतापासूनच प्लॅन बनवत असतील. मात्र हा प्लॅन तयार करताना नव्या नियमांचं भान ठेवणं गरजेचं आहे.
मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी होत असल्याने अनेक मोठी दुकाने आणि मॉल्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र सरकारने नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतल्याने आता ही दुकाने 11 पर्यंतच सुरू राहतील. 'सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य असला तरीही या निर्णयामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होणार आहे,' अशी प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, जाणून घ्या ठळक मुद्दे :
- संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी यांनी यावेळी सांगितले.
- अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
- ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.