मुंबईच्या नव्या आयुक्तांनी करुन दाखवलं! पदभार स्वीकारताच दिली होती धारावीला भेट

मुंबईच्या नव्या आयुक्तांनी करुन दाखवलं! पदभार स्वीकारताच दिली होती धारावीला भेट

मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना धारावीचा कोपरान् कोपरा माहीत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला रोखण्यात धारावी मॉडेलचे कौतुक केले. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. धारावीतील घरांची रचना, मोठी लोकसंख्या, लहान जागा, चिंचोळ्या गल्ल्या यामुळे येथे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक होता. अशा परिस्थितीत पालिकेने धारावीसारख्या अवघड भागात कम्युनिटी प्रसार होऊ दिला नाही, हे विशेष. यामध्ये आयुक्त इक्वाल सिंह चहल यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर (9 मे) तातडीने त्यांनी धारावी परिसराला भेट दिली, आणि येथील कोरोना संसर्ग प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी PPE Kit परिधान करुन थेट अतिदक्षता कक्षात रुग्‍णांची विचारसही केली.

इक्बाल सिंग चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते नियमितपणे मॅराथॉनमध्ये सहभागी होतात आणि ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण करतात. एक धडाडीचा आणि फिट अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. यापूर्वी इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. नगरविकास खात्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांची कामगिरी चांगली मानली जाते.

हे वाचा-ते फकस्त 600 व्हते! बाजीप्रभूंच्या पराक्रमावर आधारित 'जंगजौहर'चा पहिला लूक

मुंबईच्या आयुक्तपदावरून प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय तडकाफडकी घेण्यात आला. शहरात कोरोनाव्हायरसचा फैलाव आटोक्या ठेवता न आल्याने हे प्रशासकी बदल केल्याचं सांगितलं जात आहे. परदेशी हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी समजले जात असत. त्यांच्याकडे आता नगरविकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी असणार आहे.

प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बाल चहल यांनी यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कानाकोपरा माहिती आहे. या अनुभवाचा वापर कोरोनाला रोखण्यासाठी होऊ शकतो.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading