मुंबई, 16 नोव्हेंबर : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीतून बाहेर पडून काम करावे', अशी टीका भाजप नेत्यांकडून वारंवार होत आहे. तर दुसरीकडे मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी 'महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "राजसाहेब ठाकरे (Raj Thackery), कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28' असं म्हणत शिवसेनेला डिवचलं आहे.
कोरोनाच्या काळात गेल्या सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद होते. पण, हळूहळू बाजारापेठा, उद्योग धंदे सुरू करण्यात येत होते. पण, राज्य सरकारकडून अनेक व्यवसायांना सुरू करण्यास मनाई केली होती. या काळात जीम संघटना असो अथवा मासे विक्रेते असो, सर्व संघटनांनी राज ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या 'कृष्णकुंज'वर जाऊन आपली व्यथा राज यांच्याकडे मांडली होती. त्यामुळे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेला टोला लगावला आहे.
समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28
'समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28' असं म्हणत देशपांडे यांनी टोला लगावला आहे.
अनेक संघटना, व्यापारी हे राज ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या कृष्णकुंजवर जाऊन भेट घेती असतात. आपल्या समस्या, व्यथा राज ठाकरे यांच्याकडे मांडत असतात. कृष्णकुंजवर येणाऱ्या प्रत्येक संघटना आणि व्यक्तींची राज ठाकरे स्वत: भेट घेऊ व्यथा जाणून घेत असता. मंदिरं उघडण्याच्या मुद्यावर नाशिकमधील पुजारी आणि देवस्थानांनी 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. त्यावेळी 'दारूची दुकानं उघडली जातात, पण मंदिरं उघडण्यास अडचण काय?' असा सवाल राज यांनी उपस्थितीत केला होता.
एवढंच नाहीतर उद्यानं आणि सार्वजनिक बाजारापेठा सुरू झाल्यानंतर जीम सुरू करण्यास सरकारने रेड सिग्नल दिला होता. त्यावेळी जीम चालक संघटनांनीही राज यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती. 'जीम सुरू करा, पुढे काय ते पाहून घेऊ' असं सांगत राज यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी राज्य सरकारनेही राज्यातील जीम सुरू करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी अनेक विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र व्यवहार केले होते. तसंच, वीज बिल आणि शेतकऱ्यांच्या मुद्यावर अलीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली होती.