पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ ट्वीट करून राष्ट्रवादीने फडणवीसांना लगावला सणसणीत टोला!

पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ ट्वीट करून राष्ट्रवादीने फडणवीसांना लगावला सणसणीत टोला!

'एकीकडे पंतप्रधान मोदी संसदीय राजकारणात वेलमध्ये न उतरल्याबद्दल एनसीपीचं कौतुक करतात आणि राज्यात भाजपचे बाशिंदे मोदींच्या अपेक्षेला काळीमा फासतात'

  • Share this:

नागपूर, 17 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनामध्ये गेल्या दोन दिवसांपासून भाजपने आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारल्यानंतर आज राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ट्वीट करून भाजप नेते मोदींच्या अपेक्षेला काळीमा फासत असल्याचं टीकास्त्र सोडलं आहे.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये थेट हमरीतुमरीवर आले. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

या घटनेवर राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ राज्यसभेतला आहे. राज्यसभेत बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही अधिवेशनाच्या वेलमध्ये उतरून गोंधळ घातला नाही. हे भाजपने शिकलं पाहिजे, असं त्यावेळी मोदी म्हणाले होते.

त्यांच्या या भूमिकेची राष्ट्रवादीने भाजप नेत्यांना आठवण करून दिली.  "एकीकडे पंतप्रधान मोदी संसदीय राजकारणात वेलमध्ये न उतरल्याबद्दल एनसीपीचं कौतुक करतात आणि राज्यात भाजपचे बाशिंदे मोदींच्या अपेक्षेला काळीमा फासतात. राज्यात विरोधी पक्ष म्हणून भाजपा सदस्यांनी विधिमंडळाच्या उच्च परंपरांची अवहेलना चालवली आहे." अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

उगाच इथं बोंबलू नका, केंद्राकडे पैसे मागा; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजपला फटकारलं होतं.  हे या सरकारचं पाहिलं अधिवेशन आहे. सभागृहचं कामकाज जग बघतं. माझी दोन्ही पक्षांना विनंती सभागृहाच्या इतिहासाला काळीमा फासू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं.

तसंच, फक्त विरोधी पक्ष आहे, सत्तारूढ पक्षला काही देणं घेणं नाही. हे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांना वचन दिलंय ते आम्ही पाळणार. फक्त बोंबल्ल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत, असंही त्यांनी सुनावलं. आम्ही सामना वाचत नाही म्हणाऱ्यांना सामना हातात घेण्याची वेळ आलीय. आधी सामना वाचला असता तर विरोधात बसले नसते. चोरून सामना वाचण्यापेक्षा उघडपणे सामना वाचला असता तर आज सामना करायची गरज नसती, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

विरोधकांनी इथे गळा मोकळा करण्यापेक्षा केंद्राकडे करा, हवं असल्यास घसा मोकळ्या करण्याच्या गोळ्या मी देतो,  असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, सावरकरानंतर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून भाजपने विधानसभेत राडा घातला. या गोंधळामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अखेर आजचे कामकाज हे स्थगित करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: December 17, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading