ठाणे 28 मे: देशभरात कोरोनानं (Coronavirus) थैमान घातल्यानं अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचाही (Petrol Diesel Price Today) मोठा फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोलच्या किमतींनी आता शंभरी गाठली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसने हरिनिवास सर्कल इथे बॅनर लावत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या पोस्टरवर राष्ट्रवादीनं अच्छे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असा मजकूरही लिहिला आहे.
या पोस्टरवर हेल्मेट घातलेला आणि पांढरी दाढी असलेला एक क्रिकेटपटू दाखवण्यात आला आहे. या फोटोखाली त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गौरवही करण्यात आलं आहे. यासोबतच पेट्रोल १०० नॉट आऊट असंही यावर लिहिण्यात आलं आहे. राष्ट्रवादीनं या पोस्टरच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत असल्याचं चित्र आहे. मुंबईत आणि ठाण्यात पेट्रोलच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. ठाण्यात आणि मुंबईत आज पेट्रोलचे दर 100.4 रुपये तर डिझेलचे दर 91.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं होत असल्यानं वाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे फलक लावण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या काळात महागाईनं उच्चांक गाठला असून यूपीए सरकारच्या काळात इंधनाचे दर इतके कधीच वाढले नव्हते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.