मुंबई, 24 जानेवारी : राज्यात कोरोनाचे (corona cases) संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करावे, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण तरीही राजकीय नेत्यांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar corona test positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना आज सकाळीच जुन्नरच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दुपारीच खुद्द पवार यांनी ट्वीट करून कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगितले आहे.
तर दुसरीकडे आज सकाळी राष्ट्रवादी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली तमाशा फडमालक मोहित नारायणगावकर यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर फंडातून तमाशा कलावंतांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मदत देण्याचे शरद पवार यांनी घोषणा केली आहे.
धक्कादायक म्हणजे, या भेटीनंतर या अतुल बेनके आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी तमाशाला सुरू करण्यास परवानगी, देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तर, तमाशा सुरू करण्यास अडचण नाही, असं आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. यावेळी जुन्नरचे आमदार अतुलशेठ बेनके, मोहित नारायणगांवकर, मुसा भाई शेख, आविष्कार मुळे आदी उपस्थित होते.
धक्कादायक म्हणजे, सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी आमदार निलेश लंकेंनी सुळे यांची भेटे घेतल्याचे फोटो टाकले होते. पण, यावरून वाद निर्माण झाल्यानंतर तो फोटो जुना असल्याचे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला होता.
पंतप्रधान मोदींनी केला शरद पवारांना फोन
दरम्यान, शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून पवारांच्या तब्येची चौकशी केली. पंतप्रधान मोदी सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकी प्रचारात व्यस्त आहे, याही व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधानांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधानांनी फोन करून चौकशी केल्याबद्दल शरद पवारांनी आभार मानले आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
दरम्यान, शरद पवार यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच संपर्कात असलेल्या लोकांनी टेस्ट करुन घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.