Home /News /mumbai /

'सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार', जयंत पाटील यांचं मोठं विधान

'सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार', जयंत पाटील यांचं मोठं विधान

काँग्रेस नेत्यांनी विरोधी बाकावर बसायलाही तयार असल्याचं विधान केलं आहे. त्यांच्या याबाबतच्या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

    मुंबई, 23 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळेल की पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल हे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईलच. पण सध्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसची (Congress) चिंता वाढेल, असंच चित्र आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याची साद घालताना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानाकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कशा पद्धतीने बघतं हे महत्त्वाचं आहे. काँग्रेसकडून संजय राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्यातरी या भूमिकेवर रोखठोक भूमिका घेण्यात आलेली नाही. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस सध्या वेट अॅण्ड वॉच भूमिकेवर असू शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तसंच काहीसं विधान केलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी आपण विरोधी बाकावर बसायलाही तयार असल्याचं विधान केलं आहे. त्यांच्या याबाबतच्या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे. त्याबद्दल असं काही नाही. संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे ते अंतर्गत विचार करुन केलं असेल", असा दावा त्यांनी केला. "मुख्यमंत्री 'वर्षा' सोडून मातोश्रीवर जाणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी सध्याची परिस्थिती पाहून निर्णय घेतलेला दिसतोय. याचा अर्थ ते आजही मुख्यमंत्री आहेतच. पण ते 'मातोश्री'वर राहून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुठे राहावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर आमच्या नाराजीचा काही विषय येतो, असं आम्हाला वाटत नाही", अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. या दरम्यान जयंत पाटील यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. शिवसेनेच्या गोटातील हालचाली पाहता राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेच्या वेळीच भाजपला साथ द्यायला हवी होती, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये दबक्या आवाजात सुरु असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी ती पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं. "परिस्थिती बदलते तसं काही नवीन आमदार विधान करत असतात. ते काही पक्षाचं धोरण असू शकत नाही. खासगीत झालेल्या चर्चा हे पक्षाची भूमिका असू शकत नाही. एकदम सत्ता गेली तर काम होण्याच्या बाबतीतले प्रश्न काही लोकांच्या मनात असतात. त्यावेळी अशी भाषा काही लोकं वापरू शकतात. पण आम्ही एकत्रित जेव्हा बसतो तेव्हा कुणी अशी भूमिका मांडलेली नाही", असं जयंत पाटील म्हणाले. (शिवसेनेनेच केलं ऑपरेशन लोटस? मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर 20 तासांमध्येच यूटर्न का?) "संजय राऊत यांनी विधान करण्याआधी आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. पण त्यावेळी त्यांच्यात या विषयावर चर्चा झाली नाही. शिवसेनेने आज असं विधान केलं आहे. त्यात गुवाहाटीमध्ये काही आमदार अडकले आहेत. त्यांनी मुंबईत येवून बोलावे. त्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्यानंतर त्याबाबत त्यांची पावलं पडतील, असं सूतोवाच केलेलं आहे. पाहू", असं विधान जयंत पाटील यांनी केलं. "जे गुावाहाटीला गेलेले आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. त्यांनी पक्षदेखील सोडलेला नाही. गुवाहाटीवरुन ते मुंबईला आले, त्यांची बैठक होत असेल, त्यांची पक्षांतर्गत चर्चा केली. तर त्यानंतर पाहू. त्यावर आज बोलण्याची आवश्यकता आहे, असं वाटत नाही", असं जयंत पाटील म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या