मुंबई 22 ऑक्टोबर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता निश्चित झाला आहे. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मंत्रिपदाबाबत. खडसे यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. खडसे यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही खडसे यांचं त्यांच्या क्षमतेबाबात कौतुक केलं होतं. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार असं बोललं जात आहे. या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा आहे असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला होता, त्यावर बोलताना ते म्हणाले, यावर शरद पवारच बोलू शकतील. मला त्यातलं काही माहित नाही. राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांचं स्वागत आहे. आता सर्व ठरलं आहे, त्यामुळे चर्चेचं कारणच नाही असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, एकनाथ खडसे हे आज मुक्ताईनगर येथून मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असताना बुधवारी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. खडसे हे शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्ष प्रवेश करणार आहेत.
एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचं म्हटलं होतं. फडणवीस यांनी माझा छळ केला, भाजपमधल्या इतर कुणावरही माझी नाराजी नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.
मुंबई - एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळणार का? छगन भुजबळांनी दिलं हे उत्तर! pic.twitter.com/n38Frq00bS
— News18Lokmat (@News18lokmat) October 22, 2020
मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या चाळीस वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ होतो परिस्थितीनुसार मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला असल्याची खंत या वेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली असून ते याप्रसंगी भावूक झाले होते.
खडसे यांची कन्या रोहिनी खडसे खेवलकर यादेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असून रोहिनी खडसे यांनी सकाळी मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले.
खडसे हे आपल्या कार्यकर्त्यांसह वाहनाद्वारे मुंबईत जाणार होते मात्र प्रवासाचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी सहकुटूंब हेलिकॉप्टरने मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे निकटवर्तीय व कार्यकर्ते हे वाहनाद्वारे मुंबईच्या दिशेने निघाले आहे.