महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते; पवारांचा उदयनराजेंना टोला

महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते; पवारांचा उदयनराजेंना टोला

'मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही.'

  • Share this:

नवी मुंबई 15 सप्टेंबर : उदयनराजे भोसले यांनी सातारची खासदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंचा हा पक्षत्याग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी लागलाय. नवी मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी उदयनराजांचं नाव न घेता त्यांना जोरदार टोला हाणला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पक्षातल्या अनेक नेत्यांवर टीका केली होती. उदयनराजे यांचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे. त्यांना मानणारा एक वर्ग सर्व राज्यात आहे. त्यामुळे त्यांचं भाजपमध्ये जाणं राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का होतं. त्यामुळे पवार यांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण देत उदयनराजेंना जोरदार टोला हाणलाय.

पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या  सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.

महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र आपण घडवू  या. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री पाच वर्षांमध्ये आपण काय केलं हे न सांगता केवळ विरोधकांची निंदा-नालस्ती  करण्यातच धन्यता मानत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादीवर काय म्हणाले उदयराजे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार संध्याकाळी साताऱ्यात आली. माजी खासदार आणि ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला ते उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचं स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने माझं एकही काम केलं नाही. सगळे प्रस्ताव अडवून ठेवले. माझ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांनी फुलीच मारली. मात्र गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी अनेक कामं मार्गी लावली  असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली.

ते म्हणाले, नैतिकता म्हणून मी खासदारकीचा राजीनामा दिला. आता नव्याने मतदारांचा कौल घेणार. राष्ट्रवादी माझा बँड वाजविण्याचा विचार करत असेल तर मी आत्ताच सांगून ठेवतो. माझ बँड कोणीही वाजवू शकणार नाही. माझा बँड मीच वाजवणार हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीला दिला.

First published: September 15, 2019, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading