मुंबई, 21 जानेवारी : मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुगली टाकला आहे. मला मुख्यमंत्री व्हावंस वाटतं, दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटू शकतं, त्यामुळे मलाही तसं वाटणं स्वाभाविक आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
आमच्या पक्षाकडे सध्या हे पद नाही, प्रथम पक्ष आणि मग आमदारांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, त्यानंतर शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य जयंत पाटील केलं होतं, त्यातच आता त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, असं वक्तव्य केलं आहे. जयंत पाटलांच्या या दोन वक्तव्यांचा संदर्भ लावत आता राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्रीपदावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप आणि अपक्ष असे मिळून 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यात केलं होतं.
आमदारांची आकेडवारी
सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे 105, शिवेसनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फक्त दोन आमदारांचा फरक आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली असेल, तर मी त्यांना पाठिंबा देतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.