मुंबई, 18 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांची प्रकृती चांगली असून संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी, अशी विनंती केली आहे.
एकनाथ खडसे यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही' असं खडसे यांनी सांगितले.
माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 18, 2021
तसंच, 'गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी' असं आवाहनही खडसे यांनी केले आहे.
एकनाथ खडसे यांना याआधीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खडसे यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने चौकशीसाठी मुंबईत बोलावले असता खडसे यांची पुन्हा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे या दोन कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे की, कोरोनाची लागण आली असून तब्येत व्यवस्थित आहे. पुढील काही दिवस विलगीकरणात राहणार असून संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी खबरदारी घ्यावी. पुढील काही दिवस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सर्वसामान्यांचे प्रश्न आणि पक्षाचे काम करू, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी गेले पंधरा दिवस पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद यात्रा सुरू केली होती. या माध्यमातून सुमारे पाच जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांशी संवाद कार्यकर्त्यांची बैठक करत होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी प्रदेश कॉंग्रेसच्या मुख्यालयात जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यासाठी राज्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने आदेश कार्यालयामध्ये आले होते. त्याच दरम्यान जयंत पाटील यांना याची लागण झाल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19 positive, Covid19, Eknath khadse, Mumbai, Wellness