राष्ट्रवादीतील वेगवान हालचालींबद्दल धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, भाजपला लगावला टोला

राष्ट्रवादीतील वेगवान हालचालींबद्दल धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, भाजपला लगावला टोला

शरद पवार यांनी नातू आणि पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्यावर आक्रमक शब्दांमध्ये आगपाखड केल्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू आणि पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्यावर आक्रमक शब्दांमध्ये आगपाखड केल्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून पार्थ पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र त्याआधी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पक्षाचे दिग्गज नेते दाखल झाले होते. या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर इथं बैठकीसाठी गेलेल्या नेत्यांमध्ये सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील येणं बाकी आहे. मात्र बैठक संपल्यानंतर बाहेर पडताना नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

'आज मी, सुनील तटकरे, आदिती तटकरे एकत्र आलो हा योगायोग नाही. पण देवेंद्र फडणवीस यांची सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि बिहारचे निवडणूक प्रभारी होणं हा योगायोग आहे,' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपला टोला लगावला. मात्र यावेळी मुंडे यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती देणं टाळलं.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. 'आम्ही आज बैठकीत शरद पवार यांच्याशी पार्थ पवार यांच्या विषयी कोणतीही चर्चा केली नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे.

पार्थ पवार आज जाहीर करणार भूमिका?

पार्थ पवार सर्व वादाविषयी आज आपली भूमिका जाहीर करतील, अशी माहिती आहे. सु्प्रिया सुळे यांच्या भेटीनंतर आता पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही चर्चा करणार असल्याचं समजतं. काका, आत्या अशा ज्येष्ठ मंडळींसोबत चर्चा करून पार्थ आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2020, 3:00 PM IST

ताज्या बातम्या