मुंबई, 13 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना खरमरीत शब्दांमध्ये फटकारल्यानंतर पक्षात चांगलीच खळबळ उडाली. पार्थ अपरिवक्व आहे, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही टोला लगावला आहे.
छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांना उद्देशून 'नया है वह', असं म्हटलं आहे. त्यामुळे आधीच शरद पवार यांनी पार्थ यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत असातानाच भुजबळ यांनीही टोला लगावल्याने आता पुन्हा पक्षांतर्गत वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी पक्षाची बाजू सावरण्याचाही प्रयत्न केला आहे. 'पवार कुटुंबीयांमध्ये कोणतेही वाद नाहीत. अजित पवार नाराज नाहीत. कुटुंबात एखाद्याला काही सांगण्याचा अधिकार आहे. सुशांत सिंह प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही,' असं म्हणत भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादीची बैठक आणि जयंत पाटलांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांना जाहीरपणे फटकारल्यानंतर त्याचे पडसाद उमटले. दिवसभरातल्या चर्चेनंतर बुधवारी रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दीड तास चाललेल्या या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी महिती देत प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते बोलू शकतात असं जयंत पाटील यांनी सांगितलं.