आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, मुंबईत आईचं निधन

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, मुंबईत आईचं निधन

शारदाताई टोपे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शारदाताई टोपे यांच्यावर उद्या दिनांक 02 ऑगस्ट 2020 रविवार रोजी सायंकाळी 04:00 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड जिल्हा जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शारदाताई टोपे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. मात्र उपचारदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमिट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमिट करण्यात आले होते. आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.

'ती अजातशत्रू होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,' अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

'राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना श्री. राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता श्री. राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना,' असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धाजंली अर्पण केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 1, 2020, 11:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading