वादंगानंतर अजित पवारांनी केली पार्थची पाठराखण, शरद पवारांसमोर व्यक्त केली नाराजी?

वादंगानंतर अजित पवारांनी केली पार्थची पाठराखण, शरद पवारांसमोर व्यक्त केली नाराजी?

अजित पवार यांनी मुलगा पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर सार्वजिकरित्या केलेल्या आक्रमक टीकेची महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून सर्वाधिक चर्चा झाली. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचं बोललं गेलं.

पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान पार्थ पवार यांच्याबाबतीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यावेळी अजित पवार यांनी मुलगा पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

'तो अजून लहान आहे, हळूहळू तयार होईल. मात्र त्याला असे सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावणं योग्य नाही,' अशा शब्दांत शरद पवार यांच्यासमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे.

माध्यमांच्या प्रश्नासमोर अजित पवारांचं मौन

शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील सदस्याला सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण होत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच अजित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

निवासस्थानाबाहेर पडल्यानंतर गुरुवारी सकाळी अजित पवार यांना पत्रकारांनी पार्थवरील टीकेबद्दल प्रश्न विचारला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता अजित पवार निघून गेले. त्यामुळे पक्ष आणि कुटुंबातील संघर्षाबद्दल अजित पवार यांनी सध्यातरी भाष्य करण्याचं टाळल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या