मुंबई 22 ऑक्टोबर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता निश्चित झाला आहे. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मंत्रिपदाबाबत. खडसे यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खडसे यांचं पुनर्वसन कसं करायचे ते शरद पवार ठरवतील, अफवा नको, ज्यावेळेस प्रवेश करण्याचे ठरविले जाते त्यावेळेस हे निर्णय होत असतात. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात विधान परिषद पदवीधर निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावर तीन पक्ष चर्चा करणार आहे. सेनेचे सुभाष देसाई आणि थोरात यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय होईल असंही पाटील यांनी सांगितलं.
एकनाथ खडसे यांच्या समवेत त्यांच्या काही संस्थेतील लोक प्रवेश करतील, जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्हातले काही लोक प्रवेश करतील असंही ते म्हणाले. अजित दादांना थोडी सर्दी होती. कोरोना झाला का याबाबत नेमकी माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं.
उदयनारजे भोसले यांच्या शुभेच्छा फडवणीस आणि चंद्रकांत पाटील यांनी कशा घ्यायच्या हे ठरवायचं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
छगन भुजबळ काय म्हणाले?
एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा आहे असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला होता, त्यावर बोलताना ते म्हणाले, यावर शरद पवारच बोलू शकतील. मला त्यातलं काही माहित नाही. राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांचं स्वागत आहे. आता सर्व ठरलं आहे, त्यामुळे चर्चेचं कारणच नाही असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, एकनाथ खडसे हे आज मुक्ताईनगर येथून मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असताना बुधवारी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एकनाथ खडसे हे शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्ष प्रवेश करणार आहेत.