Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंची फक्त एक सवय शरद पवारांना खटकते, जाहीरपणेच केलं भाष्य

उद्धव ठाकरेंची फक्त एक सवय शरद पवारांना खटकते, जाहीरपणेच केलं भाष्य

उद्धव ठाकरे यांनी कोणत्या बाबतीत आणखी काम करायला हवं त्याबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

  मुंबई, 13 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनाला दिलेली मुलाखत सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत शरद पवारांनी विविध विषयांवर सविस्तर भाष्य केलं आहे. याच मुलाखतीत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी कोणत्या बाबतीत आणखी काम करायला हवं त्याबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. 'सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकटय़ाचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांच्या मध्ये दोघांची काही मतं असतील तर मतं जाणून घेण्याच्या संबंधीचीसुद्धा एक आवश्यकता आहे आणि म्हणून आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो की, आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही. संवाद वाढला पाहिजे,' असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. नक्की काय म्हणाले शरद पवार? प्रश्न : काँग्रेसचे जे नेते राज्य मंत्रिमंडळात आहेत, त्यांची अशी पहिली तक्रार आहे की, समन्वयाचा अभाव आहे. त्यांची दुसरी तक्रार अशी आहे की, राष्ट्रवादीला झुकतं माप मिळतंय सरकारमध्ये… – एक गोष्ट खरी आहे की, उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आहे, जी मी बघतोय ती आम्हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे आणि त्याचं कारण उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये मी अनेक वर्षांपासून पाहतो, अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून. आदेश येतो आणि तो आदेश आल्यानंतर चर्चासुद्धा होत नसते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आम्ही ज्या विचाराने वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेशच येतो असं नाही आणि समजा एखादं मत मांडलं तर त्यावर आम्ही चर्चा करू शकतो. ही आमच्या कार्यकारिणीच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची. ही पद्धत अगदी लहानथोर सगळ्यांच्यामध्ये आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वीसुद्धा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत व कामाची पद्धत तीच आहे. त्याबद्दल माझी काही तक्रारच नाही. प्रश्न : मग तुम्हाला काही अडचणी दिसत आहेत काय? – अडचण अजिबात नाही. सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकटय़ाचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांच्या मध्ये दोघांची काही मतं असतील तर मतं जाणून घेण्याच्या संबंधीचीसुद्धा एक आवश्यकता आहे आणि म्हणून आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो की, आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही. संवाद पाहिजे. – होय… तो तर हवाच! अनेक ठिकाणी वाचतो किंवा काँग्रेसचे काही मंत्री जाहीरपणे बोलतात की, प्रशासनामध्ये थोडी अस्वस्थता आहे किंवा सरकार चालवण्यामध्ये प्रशासनाचा जास्त जोर आहे. बाळासाहेब त्याला नोकरशाही म्हणायचे, लाल फीतशाही… असं आपल्याला जाणवतं का? – नाही… आता कसं आहे माहितेय का… हा जो कोरोनाचा काळ होता ना… म्हणजे अजूनही संपला असं नाही. या काळामध्ये हे चॅलेंज होतं… आव्हानच होतं आणि या आव्हानामध्ये बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून या कोरोनाचा सामना करायचा हे आव्हान मुख्यमंत्र्यांपुढे होतं आणि त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यावर ही जबाबदारी जास्त होती आणि आता आपण एकत्रित रात्रंदिवस प्रयत्न करून कोरोनाचे युद्ध जिंकलेच पाहिजे ही भूमिका आहे आणि या भूमिकेला सगळ्यांचाच पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे एकतर संवाद किंवा कामाच्या पद्धती या सगळ्या गोष्टींच्यामुळे थोडं थोडं परकोलेट होतंय ही गोष्ट खरी आहे, पण याचा अर्थ ते कायमच राहील असे वाटत नाही. प्रशासन यंत्रणेची आज त्यासाठी मदत घेतली आणि ती घेण्याची आवश्यकताही होती. आता मनोहर जोशींचे सरकार, तेही मुख्यमंत्री शिवसेनेचे होते. तेव्हा कधी अशी चर्चा झाली नाही. त्यावेळी मनोहर जोशींच्या काळात शिवसेना आणि भाजप एकत्र होते. आता शिवसेना आणि भाजपच्या ऐवजी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं सरकार आहे आणि त्यामुळे मनोहर जोशींच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालवलं तसे इथेही सरकार चालवलं जाईलच, पण आज चॅलेंज आहे ते कोरोनाचं.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: NCP, Sharad pawar, Shivsena, Uddhav thackeray

  पुढील बातम्या