मुंबई, 27 ऑक्टोबर : नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एक खळबळजनक दावा केला आहे. क्रूझवरील पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी होता. या पार्टीत ठराविक लोकांवरच कारवाई करण्यात आली असून इतरांना सोडून देण्यात आले. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराचा आणि समीर वानखेडे यांचे संबंध असल्याचा आरोपही यावेळी नवाब मलिकांनी केला आहे.
'तो' दाढीवाला कोण?
एनसीबीने क्रूझवर कारवाई केली त्यावेळी ठराविक 12-13 जणांना अटक करण्यात आली इतरांना सोडून देण्यात आले. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर या क्रूझवर उपस्थित होता. त्याची प्रेयसी सुद्धा क्रूझवर शस्त्रांसह उपस्थित होती. एनसीबीने कारवाई केली त्यावेळी ते तेथून गुपचाप निघून केले. आजही तो मोकाट फिरत आहे. याचे कारण म्हणजे तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर हा समीर वानखेडे यांचा मित्र आहे.
दिल्लीहून एनसीबीचं पथक मुंबईत येत आहे यत्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. क्रूझवरील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासावेत. माझ्याकडे तो दाढीवाला नाचत असतानाचे व्हिडीओ आहेत. एनसीबीला आवश्यक वाटल्यास त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांनी फुटेज देईल. जर एनसीबीने कारवाई केली नाही तर या प्रकरणाचा उलगडा आम्ही जाहीरपणे करू असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
इतरांना सोडून 12-13 जणांनाच का पकडले?
माझ्याकडे क्रूझवरील ड्रग्ज माफीयांच्या डान्सचा व्हिडीओ आहे, या ड्रग्ज माफीयाला हात लावले नाही बाकीच्यांना पकडले आहे. चौकशी होत आहे आम्ही त्यावर बोट दाखवणार नाही. जर एनसीबीने दखल घेतली नाही तर मला काही गोष्टी सार्वजनिक कराव्या लागतील. ट्रॅप लावून कारवाई करण्यात आली. क्रुझवरील साडे तेराशे लोकांना सोडून अवघ्या 12-13 लोकांनाच का पकडण्यात आले? असा सवालही नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे.
आरोपांची दखल घेणं गरजेचं आहे. या पत्राकडे दुर्लक्ष करू नये. माझी मागणी आहे की समीर वानखेडे, के पी गोसावी, प्रभाकर आणि समीर वानखेडेंच्या ड्रायव्हरचा सीडीआर मागवण्यात यावा. ज्या गाडीचा वापर झाला आहे इलेक्ट्रीकल तपासणी झाली पाहीजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी एनसीबीकडे केली आहे.
पोलिसांकडून परवानगी न घेता क्रूझ पार्टी
ज्यावेळी एखादा अभिनेता, अभिनेत्री एनसीबी कार्यालयात चौकशीला येत होती, त्यामध्ये एकालाही अटक झाली नाही. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या मी समोर आणणार आहे. क्रूझ पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. क्रूझवर धाड टाकण्यात आली नव्हती तर टार्गेटेड लोकांना यामध्ये पकडले आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांकडून परवानगी न घेता क्रूझ पार्टी आयोजित करण्यात आली होती.
नवाब मलिकांनी म्हटलं, क्रूझवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. सीसीटीव्हीतून पर्दाफाश होईल. जगातील सर्वांत मोठा ड्रग्ज माफीया यामध्ये आहे. दिल्लीमधून एनसीबीचं पथक येत आहे, मी फक्त क्ल्यू दिला आहे. खेळ संपला मात्र, आरोपी मोकाट फिरतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drug case, Nawab malik