गणेश नाईकांच्या साम्राज्याला खिंडार पडणार, नवी मुंबईत पुन्हा राजकीय भूकंप

गणेश नाईकांच्या साम्राज्याला खिंडार पडणार, नवी मुंबईत पुन्हा राजकीय भूकंप

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेही चांगलेच सक्रिय झाले आहेत.

  • Share this:

विनय म्हात्रे, नवी मुंबई, 7 फेब्रुवारी : नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तुर्भेमधील भाजपचे चार नगरसेवक शिवसनेच्या वाटेवर आहेत. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची तर शिवसेनेसोबतची जवळीक आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाली. त्यांचा हा अघोषित शिवसेना प्रवेश मानला जात आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले. तसेच तुर्भेमधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेही चांगलेच सक्रिय झाले आहेत. अशातच नगरसेवक फुटीची बातमी समोर आल्याने गणेश नाईक यांच्या अडचणी वाढू शकतात.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं.

कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार झाले होते आक्रमक

नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. ही महापालिका निवडणूक काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार आहेत. याच निवडणुकीची तयारी म्हणून वाशी येथे महाआघडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक आणि कुटुंबावर घणाघाती टीका केली.

'आगामी निवडणुकीनंतर नवी मुंबईत कुणी महापौर होईल, कुणी स्थायी समिती अध्यक्ष होतील, कुणी सभापती होतील, पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटले. महाआघाडीच्या नवी मुंबईतील मेळाव्याला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण हे नेते उपस्थित होते.

'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. नवी मुंबईतील एकाधिकार शाही खपवून घ्यायची नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी नाईक कुटुंबाच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. तसंच ज्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकपद मिळणार नाही, त्यांना महामंडळ आणि जिल्हा समित्यांवर घेणार, असं म्हणत अजित पवार यांनी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतला.

First published: February 7, 2020, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading