मुंबई, 16 जानेवारी : भाजपच्या नेत्याने पुस्तक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली होती. या वादावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध पेटलं आहे. आता या वादात नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. उदयनराजे किंवा शिवेंद्रराजे यांच्याबद्दल काही बोलू नये, अन्यथा जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा राणेंनी दिला.
नारायण राणे यांनी आज भाजप कार्यालयात जाऊन नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. संजय राऊत यांना पत्रकार म्हणणार नाही, त्यांना फार माज आला आहे. जीभ फार चालत आहे. सत्तेत येण्याआधी आमचीच सत्ता येणार असा दावा ते करत होते आणि आली. पण सत्तेत सत्तेत त्यांच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही. संजय राऊत ज्या प्रकारे बोलताय त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
तसंच, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल काही बोलाल किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलला तर तुमची जीभ जागेवर राहणार नाही, अशा सज्जड दम नारायण राणेंनी दिला.
उदयनराजे किंवा शिवेंद्रराजे यांच्याबद्दल पुरावे मागू नये, मग कोण संजय राऊत आणि वडिलांचा पुरावा मागितला तर काय होईल, असा इशाराही त्यांनी लगावला. तसंच, शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पुढे जे काही घडेल त्याला सरकार जबाबदार राहिल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
संजय राऊतांची चौकशी करा
संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमशी बोलत होतो आणि त्याला दमही भरला होता, असा एका मुलाखतीमध्ये दावा केला आहे. त्यामुळे राऊत हे दाऊदशी काय बोलत होते, कधी बोलले, याबद्दल गृहखात्याने राऊत यांची चौकशी करावी, अशी मागणीही राणेंनी केली.
'उद्धव ठाकरेचं राऊतांकडून बोलवून घेतात'
संजय राऊत हे सामनाचे संपादक आहे. सामनाचे संपादक हे उद्धव ठाकरे सुद्धा आहे. नेता असल्यामुळे संजय राऊत जे बोलतीत नैतिकतेनुसार ते उद्धव ठाकरे सुद्धा बोलता. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना बोलायला लावत तर नाही ना. उद्धव ठाकरे तर संजय राऊत यांना बोलायला सांगत तर नाही ना? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या विधानावर का प्रतिक्रिया देत नाही, असा प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थितीत केला.
किती मुख्यमंत्री आहे?
मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आठवडी बाजार आहे. मागील सरकारनं काय केलं याची चर्चा होते. पण आपण काय करावं हे सांगत नाही. मुख्यमंत्री नेमकं कोण आहे ? उद्धव ठाकरे ? अजित पवार ? की जयंत पाटील? की बाहेरचा संजय राऊत? या राज्याला किती मुख्यमंत्री आहे. निवेदनावर कोणतीही कारवाई नाही. मग त्यावर लिहिणार कोण ? कारवाई कोण करणार आहे, असा सवालही राणेंनी उपस्थितीत केला.
'काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं'
संजय राऊत हे इंदिरा गांधी यांच्याबद्दलही बोलले आणि विधानही मागे घेतलं. पण लोकं विसरणार नाही. करिम लाला हा काही राजकीय नेता नव्हता. तो एक स्मग्लर होता. सत्ता आणि सत्तेपुढे इंदिरा गांधी काहीच नव्हत्या. इंदिरा गांधी यांच्याबद्दल राऊतांच्या मनांत काय आहे आदर की द्वेष ?आणि काँग्रेसचे नेते गप्प का आहेत. सत्तेपुढे इंदिरा गांधी कोणीच नाही, काँग्रेसवाल्यांना काहीच वाटत नाही का? त्यामुळे काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, असंही राणे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.