CM पदापासून बाजूला होताच फडणवीसांना कोर्टाचा समन्स, ठेवला 'हा' ठपका

CM पदापासून बाजूला होताच फडणवीसांना कोर्टाचा समन्स, ठेवला 'हा' ठपका

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना दुसरीकडे राज्याची उपराजधानीत...

  • Share this:

मुंबई,29 नोव्हेंबर: देशाची आर्थिक आणि राज्याची मुख्य राजधानी असलेल्या मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना दुसरीकडे, राज्याची उपराजधानीत अर्थात नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाने नोटीस बजावली आहे. नागपूरच्या स्थानिक कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांच्या घरी समन्स पाठवले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन गुन्ह्याच्या खटल्याची माहिती लपवल्याची त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नागपूरचे पोलीस निरीक्षक महेश बनसोड यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावल्याची माहिती दिल्याचे 'एएनआय' वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात 1996 आणि 1997 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या दोन्ही आरोपांची निश्चिती झाली नव्हती. पण या गुन्ह्यांविषयीची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात न लिहिल्याने नागपूरमधील वकील सतीश उके यांनी त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. फडणवीस यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला चालवण्याची वकील उके यांनी मागणी केली होती. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने वकील उके यांची याचिका फेटाळून लावत फडणवीसांना दिलासा दिला होता.

नंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नागपूरच्या दंडाधिकारी न्यायालयाने 1 नोव्हेंबर रोजी याचिकेवर पुन्हा सुनावणीस सुरुवात केली होती. 4 नोव्हेंबरला फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीला 4 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश होते. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन गुन्ह्याच्या खटल्याची माहिती लपवल्याची त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 10:52 AM IST

ताज्या बातम्या