मुंबई, 2 जानेवारी : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत हत्येची घटना घडली आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतच दोघांनी मिळून एका 22 वर्षीय युवतीचा खून केला आहे. मुंबईतील खार परिसरात असणाऱ्या भगवती हाइट्स या इमारतीत ही हत्या झाली आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
पार्टी सुरू असताना झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. जान्हवी कुकरेजा असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये मृत तरुणीच्या बॉयफ्रेण्डचाही समावेश असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्री जोगधनकर आणि दिया पडणकर यांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवीनं दोन्ही आरोपींना अश्लील कृत्य करताना पाहिलं होतं. यानंतर या तिघांमध्ये भांडण सुरू झालं. या भांडणातून दोन्ही आरोपींनी योजना आखून जान्हवीची हत्या केली आहे. पोलीसांच्या मते, या पार्टीत उपस्थित बर्याच लोकांनी दारू प्यायली होती. 'पार्टी सुरू असल्याने मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. अशातच जान्हवी कुकरेजा हिला दोन जणांनी मारहाण सुरू केली. केस ओढत तिला खाली पाडण्यात आलं. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पायऱ्यांवर तिचं रक्तही सांडलं होतं,' अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे.
पार्टीसाठी आरोपींनी जान्हवीला पिक अप केलं होतं
साधारणतः रात्री 12.15 वाजता जान्हवी आपले दोन मित्र श्री आणि दियासमवेत पार्टीत गेली होती. श्री आणि दिया स्वत: जान्हवीच्या घरी तिला पार्टीत घेवून जाण्यासाठी आले होते. पार्टीत जाण्यापूर्वी सर्वांनी जान्हवीच्या वडिलांचा वाढदिवसही साजरा केला होता. जाताना सर्वजण आनंदात गेले होते. पण तिथे पार्टीत झालेल्या वादामुळे श्री आणि दीयाने मिळून जान्हवीची हत्या केली आहे. 22 वर्षीय श्री जोगधनकर आणि 19 वर्षीय दीया पडनकर यांच्याविरुद्ध कलम 302 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.