Home /News /mumbai /

फेसमास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांना दणका, महापालिकेने वसूल केले 27 लाख रुपये

फेसमास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांना दणका, महापालिकेने वसूल केले 27 लाख रुपये

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

नागरिकांवर रुपये 1 हजार पर्यंत दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई, 3 सप्टेंबर : 'कोविड – 19' च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर 'मास्क' (मुखावरण / मुखपट्टी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच 'मास्क'चा वापर न करणाऱ्या नागरिकांवर रुपये 1 हजार पर्यंत दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे 'मास्क' वापरण्या विषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणाऱ्या किंवा चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई 9 एप्रिल 2020 पासून नियमितपणे करण्यात येत आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून आता अधिकाधिक नागरिक 'फेसमास्क' वापरताना दिसून येत आहेत. 9 एप्रिल 2020 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान 'मास्क' न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या 2 हजार 798 नागरिकांकडून रुपये 27 लाख 48 हजार 700 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असलेली विना 'मास्क' विषयक दंडात्मक कारवाई ही विभागास्तरावर करण्यात येत आहे. 9 एप्रिल ते 31 ऑगस्ट या सुमारे 5 महिन्यांच्या कालावधी दरम्यान सर्वाधिक म्हणजेच रुपये 5 लाख 4 हजार इतकी दंड वसूली ही 'के पश्चिम' विभागाद्वारे करण्यात आली आहे. त्या खालोखाल रुपये 4 लाख 21 हजार इतका दंड 'आर दक्षिण' विभागात तर रुपये 4 लाख 8 हजार 500 इतका दंड 'सी' विभागाद्वारे वसूल करण्यात आला आहे. 9 एप्रिल ते 31 ऑगस्ट या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीदरम्यान सर्वाधिक म्हणजेच रुपये 9 लाख 45 हजार एवढा दंड 'मे 2020' या महिन्यात वसूल करण्यात आला आहे. तसेच रुपये 5 लाख 88 हजार एवढा दंड 'जून' महिन्यात, तर रुपये 4 लाख 82 हजार 700 इतका दंड 'एप्रिल' महिन्यात वसूल करण्यात आला आहे. मे 2020 मध्ये विनामास्क विषयक कारवाई अंतर्गत 953 व्यक्तींकडून दंड वसूली करण्यात आली. तर जून 2020 मध्ये 589 प्रकरणी आणि एप्रिल 2020 मध्ये 523 प्रकरणी दंड वसूली करण्यात आली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्‍या ठिकाणी वावरताना 'फेस-मास्क' वापरावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, यानंतरही 'मास्क' वापरणे टाळणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जनजागृती व दंडात्मक कारवाई या दोन्ही बाबींमुळे सकारात्मक परिणाम साधला जाऊन व नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होऊन आता सार्वजनिक ठिकाणी 'मास्क' वापरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम होऊन काही प्रमाणात ‘कोविड –19’ चा प्रसार रोखण्‍यातही मदत होत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या