लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या संकटावर मुंबईच्या डबेवाल्यांनी शोधलं आता नवं उत्तर

लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या संकटावर मुंबईच्या डबेवाल्यांनी शोधलं आता नवं उत्तर

वर्क फ्रॉम होम, सोसायट्यांमध्ये प्रवेशास निर्बंध आणि बहुतांशी कामगारांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे डबेवाल्यांच्या ग्राहक संख्येत कमालीची घट झालेली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : मुंबईच्या डबेवाल्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवासास परवानगी मिळाली आहे. परंतु सरकारी तसेच खाजगी कार्यालयातील कामगार कपात, वर्क फ्रॉम होम, सोसायट्यांमध्ये प्रवेशास निर्बंध आणि बहुतांशी कामगारांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे डबेवाल्यांच्या ग्राहक संख्येत कमालीची घट झालेली आहे.

रेल्वेतून प्रवासाला पाठपुरावा करुन मुभा मिळाली, सतत सात महिने पडून असलेल्या आणि पावसाळी दिवस असल्यामुळे गंजून निकामी झालेल्या सायकल दुरुस्त करणे अथवा नवीन खरेदी करण्याचं आव्हान आहे. तसंच कोरोनाच्या प्रादूर्भावातून डबेवाले कामगार तसेच ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करूनही ग्राहक वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आज मितीला 5 हजार डबेवाल्यांपैकी केवळ 450 डबेवाले प्रत्येकी केवळ 5 ते 6 डबे पोहोच करत आहेत.

एकंदरीत परिस्थिती पाहता कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ या डबेवाल्यांच्या संघटनेने आपल्या ग्राहकांना तसेच मुंबईकरांना शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे , अन्नधान्य थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोच करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तम दर्जा आणि वाजवी किमती ही विक्री करण्यासाठी डबेवाल्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे.

वर्षानुवर्षे सेवा देत ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मुंबईचे डबेवाले याच विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकांना उत्तम सेवा देऊन रोजगार निर्मिती करणार असल्याचे मुंबई डबेवाले संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी जाहीर केले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 7, 2020, 8:52 PM IST

ताज्या बातम्या