मुंबई, 9 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेला कोरोनाचा ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूने जगभरात दहशत माजवली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची पुन्हा एक मोठी लाट आलेली आहे. या नव्या विषाणूचा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. विशेष म्हणजे हा विषाणू महाराष्ट्रातदेखील (Maharashtra) दाखल झालाय. मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे धाकधूक वाढली होती. याआधी कोरोनाच्या ज्या दोन लाटा आल्या होत्या त्यामध्ये मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) ही दोन शहरं सर्वाधिक बाधित ठरली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे (Health Department) या आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणखी सक्षम होण्याची जास्त गरज असल्याचं बोललं जात होतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक खूप मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगचे (Genome sequencing report) नवे रिपोर्ट समोर आले आहेत. त्यामध्ये ओमायक्रोनबाधित रुग्णाची संख्या ही केवळ 2 असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे, असं नमूद करण्यात आलं आहे.
कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत पाचव्या चाचणीचे (जिनोम सिक्वेंसिंगचे) निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 221 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 11 टक्के रुग्णांमध्ये 'डेल्टा व्हेरिअंट'ची बाध झाल्याचं निषपन्न झालंय. तर 89 टक्के नागरिकांना 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह'ची लागण झालीय. विशेष म्हणजे केवळ 2 रुग्णांना ओमायक्रोनची बाधा झाल्याचं उघड झालं आहे. या सर्व संकलित नमुन्यांमधील कोणाचाही मृत्यू नाही, अशी देखील माहिती आता समोर आली आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे. चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ओमायक्रॉन विष्णुचे रुग्ण हे संकलित नमुन्यांच्या संख्येत 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. संकलित केलेल्या 221 पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
हेही वाचा : कित्ती गोड! आईचा मेकओव्हर पाहून बाळाची गोड प्रतिक्रिया, पाहा CUTE VIDEO
चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे, असं राज्य सरकारने काढलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे. मुंबईतील 221 रुग्णांपैकी 19 रुग्ण (9 टक्के) हे 0 ते 20 वर्षे आतील वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 69 रुग्ण (31 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 73 रुग्ण (33 टक्के), 61 ते 80 वयोगटात 54 रुग्ण (25 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील 6 रुग्ण (3 टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.
दोन ओमायक्रॉन बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची देखील कोविड चाचणी केली असता त्यातही कोणालाही कोविड बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चाचणी निष्कर्षातील महत्त्वाची बाब म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, या 221 पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या 26 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या 47 पैकी 12 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने, या 221 पैकी कोणाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे.
हेही वाचा : व्हीआयपींसाठी विमान आणि हेलिकॉप्टरचे सुरक्षा नियम काय आहेत?
एकूण 221 रुग्णांपैकी, वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये 13 जण मोडतात. पैकी 2 जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ आणि 11 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.