मुंबई, 31 ऑक्टोबर : अंधेरी परिसरात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. जोगेश्वरीहून अंधेरीच्या दिशेनं जात असलेल्या क्रेनंचा भीषण अपघात झाला आहे. मेट्रोच्या कामासाठी सकाळी 6 वाजता ही क्रेन जोगेश्वरीहून अंधेरीच्या दिशेनं जात असताना हा भयंकर प्रकार घडला.
अंधेरीतील गुंदवली बस स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुंदवली बस स्थानकाजवळ आल्यानंतर क्रेन चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि क्रेन पिलरला धडकली. क्रेनचे दोन तुकडे झाले त्यातला एक भाग तिथे असलेल्या एक महिलेच्या अंगावर कोसळला तर दुसरा उभ्या असलेल्या रिक्षा आणि इतर गाड्यांवर. अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की बस पकडण्यासाठी उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर क्रेनच्या एक भाग कोसळून तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला क्रेनच्या मागच्या चाकांमध्ये अडकली आणि चिरडली गेली. या महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. तर उभ्या असलेल्या रिक्षाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
बस स्थानकावर बसची वाट पाहात उभ्या असलेल्या आणखीन काही नागरिकांना या क्रेनमुळे दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान क्रेन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला अशी माहिती मिळाली आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.