मुंबई विद्यापीठाच्या निकालात 90 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही नापास

मुंबई विद्यापीठाच्या निकालात 90 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही नापास

काही नामांकित महाविद्यालयांतील ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निकालामध्ये फक्त १५-२० गुण मिळाल्याचं उघडकीस आलंय.फक्त पुरवण्यांचं मूल्यांकन करुन गुण दिल्यामुळे हे विद्यार्थी नापास झाल्याचा दावा महाविद्यालयांचे प्राचार्य करत आहेत.

  • Share this:

मुंबई,13 ऑगस्ट: मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाच्या आग्रहामुळे निकाल लांबणीवर पडले आहेत. पण त्याचसोबत आता उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावरूनही नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण काही नामांकित महाविद्यालयांतील ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निकालामध्ये फक्त १५-२० गुण मिळाल्याचं उघडकीस आलंय. फक्त पुरवण्यांचं मूल्यांकन करुन गुण दिल्यामुळे हे विद्यार्थी नापास झाल्याचा दावा महाविद्यालयांचे प्राचार्य करत आहेत.

विद्यापीठाने घाईघाईत उरकलेल्या ऑनलाइन मूल्यांकनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तांत्रिक घोळ निर्माण झाल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत. मिठीबाई महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील एक विद्यार्थी आत्तापर्यंत महाविद्यालयामध्ये नेहमीच प्रथम क्रमांक पटकावत आला आहे. मात्र, सहाव्या सत्रातील परीक्षेतील एका विषयात त्याला फक्त १७च गुण प्राप्त झाल्याचं निकालामध्ये दाखविण्यात आलं आहे. तर रुईया महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील हुशार विद्यार्थ्याला पाचव्या सत्रामध्ये १४ गुणच प्राप्त झाल्याचं निकालामध्ये दिसतंय.

निकालांच्या गोंधळामुळे नेहमी ९० टक्क्याच्या आसपास गुण मिळवून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी नुकत्याच जाहीर झालेल्या विज्ञान शाखेच्या निकालामध्ये नापास झाल्याचं दाखविण्यात आलंय. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या फक्त पुरवण्यांचं मूल्यांकन करुन गुण दिले असल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप होतो आहे.

मुंबई  विद्यापीठाचे  आतापर्यंत  328 निकाल जाहीर झाले आहेत.

First published: August 13, 2017, 8:47 AM IST

ताज्या बातम्या