मुंबई, 16 सप्टेंबर : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरच्या बाल्कनी बाहेर येऊन एक शिक्षक आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. सदर व्यक्तीचं आडनाव खैरे असं असल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली असून फायर ब्रिगेडचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करणारा विना अनुदानित शिक्षक आहे. राज्यात 20 हजार शिक्षक विनाअनुदानित आहेत. कोरोना काळात अनेक शिक्षकांचे पगार झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर शिक्षकाने आक्रमक होत आत्महत्येचा इशारा दिला आहे. विनाअनुदानित शिक्षकांबद्दल जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असं या शिक्षकाने म्हटलं आहे.
भाजप आमदार संतोष दानवे यांच्या रूम नंबर 401 मध्ये गजानन खैरे रहात होते, अशी माहिती आता समोर येत आहे.
VIDEO : आमदार निवासावर चढलेल्या शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न, मंत्र्यांच्या विनंतीनंतरही खाली उतरण्यास नकार pic.twitter.com/5OVyVDMhvn
— News18Lokmat (@News18lokmat) September 16, 2020
समजूत काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष सरसावले
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची समजूत काढण्यासाठी आले आहेत. 'तुम्हाला न्याय मिळेल याची शास्वती देतो. कोरोनामुळे परीस्थिती बिघडली आहे. मी विनंती करतो खाली या,' असं आवाहन नाना पटोल यांनी केलं आहे.
उदय सामंतही घटनास्थळी दाखल
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेही घटनास्थळी आले आहेत. ते देखील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाची समजूत काढत आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देत आहेत. तरी सदर व्यक्ती जीआर काढण्याच्या मागणीवर अडून असल्याने उदय सामंत हे लेखी पत्र आणण्यासाठी गेले आहेत.
दरम्यान, गावोगावी अनेकदा मागणी करूनही ती पूर्ण न झाल्याने अनेकजण मुंबईत धडकतात. याआधी अनेक जणांनी थेट मंत्रालयात जात आपल्या मागण्यांसाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांनंतर शासन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.