'आम्हाला पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री हवा'; महायुतीमधील नेत्याच्या भूमिकेमुळे शिवसेना बॅकफूटवर!

'आम्हाला पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री हवा'; महायुतीमधील नेत्याच्या भूमिकेमुळे शिवसेना बॅकफूटवर!

राज्यात पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री हवा आणि आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा देत आहोत.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाल्यानंतर देखील अद्याप सरकार स्थापनेबाबत गोंधळाचे वातावरण आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी स्पष्ट केले असले तरी शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचे सूत्र अद्याप निश्चित होत नाही. भाजपला 2014च्या तुलनेत कमी जागा मिळाल्याने शिवसेनेने मुख्यमंत्रपदासह अधिकची मंत्रिपदे मागितली आहेत. सेनेच्या या मागणीवर भाजपने मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद वगळता अधिकची मंत्रिपदे देण्याची तयारी दर्शवली आहे. असे असले तरी शिवसेना अद्याप ही लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या गोष्टीनुसार सत्तेत वाटा मागत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात अद्याप अधिकृत चर्चा सुरु झाली नाही. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

राज्यात पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री हवा, असे रामदास आठवले यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा देत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. आठवले यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने प्रत्येकी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असावा अशी मागणी केली आहे. पण आठवले यांनी पाच वर्षासाठी एकच मुख्यमंत्री हवा आणि हे पद देवेंद्र फडणवीस यांनाच मिळावे असे म्हटल्याने शिवसेना बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे.

रामदास आठवले यांच्या या भूमिकेमुळे भाजपचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी बळकट होऊ शकतो. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्ता वाटपात भाजप शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह अधिकचे मंत्रिपद आणि केंद्रात राज्यमंत्रीपद देऊ शकते. शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांचा विचार करता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. यातील एक उपमुख्यमंत्री भाजपचा तर एक शिवसेनेचा असेल. शिवसेनेकडून अधिक मंत्रीपदांची देखील मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारमधील काही महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर केंद्रात देखील अधिकचे मंत्रिपद मिळू शकते. राज्यात उपमुख्यमंत्रीपद, अधिकचे खाती आणि केंद्रात राज्य अथवा स्वतंत्र कारभार असलेले मंत्रिपद शिवसेनेला दिले जाऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या