मुंबई, 5 जुलै : जून महिन्यात गायब झालेल्या मान्सूनने (Monsoon Update) जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत कालपासूनच पावसाची (Mumbai Rains Update) संततधार सुरु आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्याची भीती वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेने (BMC) ट्वीट करत माहिती दिली की, आज 5 जुलै रोजी मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वारूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भरतीची वेळ सायंकाळी 4 वाजून 10 मिनिट असून त्यावेळी चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ओहोटी 10 वाजून 21 मिनिट या वेळेत असेल.
५ जुलै २०२२ हवामान अंदाज :-.
मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वारूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भरती :- सायं ४:१० वा. - ४.०१ मी. ओहोटी:- रात्री १०:२१ वा. - ०१.७५ मी. — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2022
पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यात 12 जिल्ह्यांना रेड तर 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरला या जिल्ह्याना धोक्याचा इशारा देण्यात आलाय तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये
राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना (NDRF) तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी सकाळी लवकर जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Mumbai, Mumbai rain