Home /News /mumbai /

मुंबईत भीषण पावसाचे बळी : पाणी सोडायला लिफ्टमधून गेले आणि बेसमेंटमधल्या पाण्यातच बुडाले 2 वॉचमन

मुंबईत भीषण पावसाचे बळी : पाणी सोडायला लिफ्टमधून गेले आणि बेसमेंटमधल्या पाण्यातच बुडाले 2 वॉचमन

Mumbai Rains लिफ्टचं दार उघडताच बेसमेंटमध्ये साठलेलं पाणी जोराने आत घुसलं आणि काही कळायच्या आत हे दोघे गुदमरले. मुंबईत एका बहुमजली इमारतीत हा प्रकार घडला आहे.

    मुंबई, 23 सप्टेंबर : दररोज सकाळी पाण्याचा नळ सोडण्यासाठी जातात त्याप्रमाणे एका बहुमजली इमारतीचे दोन वॉचमन लिफ्टने बेसमेंटपर्यंत गेले. पण लिफ्टचं दार उघडताच बेसमेंटमध्ये साठलेलं पाणी जोराने आत घुसलं आणि काही कळायच्या आत हे दोघे गुदमरले. बाहेर पडायची संधीच न मिळाल्याने दोन सिक्युरिटी गार्ड्सचा बुडून मृत्यू झाला. ही भीषण घटना मुंबईत आग्रीपाडा भागात घडली. मुंबईला मंगळवारपासून पावसाने झोडपून काढलं आहे. वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर खरोखर मुंबईच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस झाला आणि अनेक सखल भागात पाणी साठलं. बुधवारी उशिरापर्यंत अनेक भागात पाण्याचा निचरा झालेला नव्हता. सकाळी पावसाचा जोर ओसरल्यावर नेमक्या नुकसाचाना अंदाज येत आहे. आग्रीपाड्यातली एक घटना अशीच संध्याकाळी उशिरा उजेडात आली आहे. जमीर अहमद सोहानन (वय 32) आणि शहजाद मोहम्मद सिद्दिकी मेमन (वय 37) असं मृत्यूमुखी पडलेल्या सिक्युरिटी गार्डची नावं आहेत. काला पानी जंक्शनजवळ नाथानी रेसिडेन्सी या इमारतीत हे दोघे काम करत होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाणी सोडण्यासाठी ते बेसमेंटमध्ये जायला निघाले. लिफ्टने ते तळमजल्यापर्यंत गेले मात्र, दरवाजा उघता क्षणीच पाणी जोराने आत आलं. लिफ्टचं दारही बंद झालं. या दोघांना बाहेर पडायची किंवा सुटका करण्याची संधीच मिळाली नाही. या दोघांनीही आरडाओरडा केला, लिफ्टचा अलार्म वाजवला. त्यानंतर इमारतीमधल्या काही लोकांनी फायर ब्रिगेडला फोन केला. अग्निशमन दल आणि पोलिसांचे जवान येईपर्यंत वेळ गेलेली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टच्या वरचा भाग कापून या दोघांना वर खेचलं पण तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला होता. या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पण मृत्यूचं नेमकं कारण तपासणीनंतरच समोर येईल, असं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचं धुमशान सुरूच आहे. 39 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 23 सप्टेंबर 1981रोजी मुंबईत विक्रमी 318.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज (23 सप्टेंबर 2020) 286.4 एवढ्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. महिन्याभरात पडतो तेवढा पाऊस फक्त 8-10 तासांत पडल्याने दाणादाण उडाली. अनेक इमारतींचे तळमजले, लिफ्ट यामध्ये पाणी शिरलं. अनेक वस्त्यांमधल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Mumbai rain

    पुढील बातम्या