मुंबई, 09 जून : मुंबईत पावसाने (Rain in Mumbai) दमदार एंट्री केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. धारावी परिसरात साचलेल्या पाण्यातून जात असताना धारावीमध्ये एका व्यक्ती विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. तातडीने या व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जोरदार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातून जात असताना खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. पण, धारावीमध्ये साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना एका व्यक्तीला अचानक विजेचा जबर झटका लागला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी लाकडी बांबूच्या मदतीने या व्यक्तीची सुटका केली.
विजेचा जबर झटका लागल्यामुळे सदरील व्यक्ती जागेवर बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेत या व्यक्तीला सध्या सायन रूग्णालयात दखल करण्यात आले आहे. उपचार सुरू आहे. मुंबईतील पावसातील ही पहिली घटना आहे. मात्र, या व्यक्तीला विजेचा धक्का हा कशामुळे लागला हे मात्र, अद्याप कळू शकले नाही.
3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. यानंतर आता पुढील तीन तासांत मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्यानं (IMD) दिला आहे.
सध्या मान्सूनने महाराष्ट्रात दक्षिण भागासह पुणे, रायगड, अलिबाग या परिसरात धडक मारली आहे. आता मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पुढील काही तासांत मुंबईत कधीही मान्सूनचं (Monsoon in Mumbai) आगमन होऊ शकतं. असं असताना मागील तीन दिवसांपासून मुंबईला पूर्व मोसमी पावसानं झोपडून काढलं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यावर्षी देशात 101 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
असं असताना मान्सून दाखल होण्यापूर्वीच मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात झाली आहे. मागील 12 तासांत मुंबईत 140 ते 160 मिली इतका पाऊस झाला. तर 24 तासांत 500 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची पुरती धांदल उडाली आहे. यानंतर आता पुढील तीन तासांत आणखी पावसाची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dharavi, Mumbai rain