Mumbai rain Updates : थोडक्यात टळली दुर्घटना, दरड कोसळली आणि मारुतीची कार सापडली

Mumbai rain Updates : थोडक्यात टळली दुर्घटना, दरड कोसळली आणि मारुतीची कार सापडली

कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. टाईम्स ऑफिसच्या जवळ ही दुर्घटना घडली.

  • Share this:

मुंबई, 04 ऑगस्ट : मुंबईत पावसाने धुमशान घातले आहे. आधीच कोरोनाची सामना करणाऱ्या मुंबईकरांचे पावसामुळे हाल झाले आहे. मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. कांदिवली परिसरात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. टाईम्स ऑफिसच्या जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

लोकल सेवा ठप्प

अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे स्थानकावर सायन इथं ट्रॅकवर पाणी साचले आहे. तसंच परेल आणि सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर ठाणे ते कल्याण, कर्जत कसारा वाहतूक सुरू आहे. हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प झाली आहे. परंतु, वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे.

घरातून बाहेर न पडण्याचे पालिकेचे आवाहन

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

Published by: sachin Salve
First published: August 4, 2020, 9:11 AM IST

ताज्या बातम्या