मुंबई, 11 जुलै : सतत ४ दिवस मुंबईकरांची दाणादाण उडवणारा पाऊस अखेर पाचव्या दिवशी थांबलांय. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान काल झालेली वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे. पण हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पाऊस जरी नसला तरी ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी अंधार पसरला आहे. येत्या शनिवारपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
काल खोळंबलेली पश्चिम रेल्वेवरील पहिली लोकल चर्चगेटसाठी रवाना झाली आहे. तर विरारहून पहिली लोकल चर्चगेटसाठी रवाना झाली आहे. पण लांब पल्ल्यांची वाहतूक अजूनही विस्कळीत आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती मिळत आहे.
One suburban service was run on UP slow line from Virar at 6.22 hrs but regular services ex Virar will be started only after water level comes down to safe level. Empty stranded rakes of long distance rakes are being cleared one by one to clear the tracks. #WRUpdates @drmbct
— Western Railway (@WesternRly) July 11, 2018
पालघर परिसरात अजूनही पाऊस सुरुच आहे. विरार ते वसईते दरम्यान रुळावरचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी पहिली लोकल विरारहून चर्चगेटच्या दिशेने सोडली मात्र अद्याप भाईंदर ते चर्चगेट नियमित लोकल सेवा सुरु झालेली नाही.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाची स्थिती पाहता, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे आज मुंबईची पाहणी करणार आहेत. सध्या नागपूरात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या तुंबापूरीवरून विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं. त्यामुळे विरोधकांच्या टीकेनंतर मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपूर पावसाळी अधिवेशन सोडून विनोद तावडे आज मुंबईत येणार आहेत.
दोन दिवस जोरदार पडलेल्या पावसाने डोंबिवलीतील नाले तुडूंब भरले असून या नाल्यात २ जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली इथल्या नाल्यात काल रात्री 9च्या सुमारास हर्षद जिमकल नावाचा एक तरुण नाल्यात पडला, तो कसा पडला याबाबत कोणालाच माहित नसून तो वाहत जाताना काही लोकांनी पाहिलं. तोच त्याला वाचवण्याकरता एका तरुणाने देखील नाल्यात उडी मारली. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, पण ते फक्त बघ्याची भुमिका घेतायेत असा आरोप स्थानिक करतायेत.
नाल्यासोपाऱ्यामध्ये वडोदरा एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 411 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं. सध्या सर्व प्रवाशांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा