मुंबईकरांनो, ऑफिसमधून घरी निघताना सावधान! पुढचे 3- 4 तास धोक्याचे

मुंबईकरांनो, ऑफिसमधून घरी निघताना सावधान! पुढचे 3- 4 तास धोक्याचे

मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढच्या काही तासांत विजांसह पावसाला पोषक असे उंचीवरचे ढग जमल्याचं रडावरचं दृश्य वेधशाळेचे उपसंचालक होसाळीकर यांनी शेअर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : दुपारनंतर अचानक मळभ दाटून आलं आहे. आता मुंबई (mumbai rain) आणि परिसरावर जास्त उंचीवर ढग जमा झाले असल्याने विजांच्या कडकडाटासह वादळी (thunderstorm) पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 3 ते 4 तास सावध राहा, असा इशारा मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढच्या काही तासांत विजांच्या गडगटाला पोषक असे ढग जमल्याचं रडावरचं दृश्य त्यांनी शेअर केलं आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढचे दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याचं वातावरण बदललं आहे. यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबला आहे. गेल्या काही तासांत या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागाला हवामान खात्याने सतर्कचा इशारा दिला आहे.

गेल्या 2 - 3 तासांत पेण, नागोठणे, रोहा परिसरात जोरदार गडगटाट सुरू आहे. ठाण्यातही ढगांच्या गडगटाला सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला तर रस्त्यात पाणी साठणं, झाडं पडण्याचा धोका आहे. नेमक्या ऑफिस सुटण्याच्या वेळात आणि गर्दीच्या वेळातच वादळी पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेने मुंबईकरांसाठी सावध राहा, असा इशारा दिला आहे.

ऑक्टोबरमध्ये अचानक पाऊस सुरू झाला त्यामागचं कारण आहे अंदमानच्या समुद्रातला कमी दाबाचा पट्टा.

ऑक्टोबरमध्ये अचानक पाऊस सुरू झाला त्यामागचं कारण आहे अंदमानच्या समुद्रातला कमी दाबाचा पट्टा. मुंबई, पुण्यासह राज्याच्या 16 जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी जोरदार वारा आणि विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.

संपूर्ण राज्यभर आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाडा वाढणार आणि त्याबरोबरच दुपारनंतर धुवांधार वादळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज मान्सूनसारखा सर्वदूर वर्तवण्यात आलेला नाही. काही भागात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो तर थोड्याच अंतरावर पावसाचं प्रमाण कमी असू शकतो. यामुळे कमी वेळात अधिक पाऊस बरसण्याचा धोका आहे. त्याबरोबर विजांचाही धोका असल्याने हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 13, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या