प्रदीप भणगे, दिवा, 04 आॅक्टोबर : लोकलच्या दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करणाऱ्या आणि लोकलमधून पडता पडता वाचलेल्या स्टंटगर्लविरोधात अखेर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा भोसले फरार झालीये.
पूजा भोसले नावाची ही मुलगी सोमवारी लोकलच्या दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करत होती. यावेळी तिचा हात निसटून लोकलच्या खाली पडत असताना अन्य प्रवाशांनी तिला वाचवलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे इतकं सगळं होऊनही तिची मुजोरी मात्र कायम असल्याचं समोर आलं होतं.
ज्याने वाचवलं तो देवमाणूस होता यात वाद नाही, पण ज्याने माझा व्हिडीओ काढून पसरवला, त्याचा पत्ता मला द्या, त्याला मी सोडणार नाही, असा पवित्रा तिनं घेतला.
जो व्हिडिओ रेकॉर्ड करत होता त्याने मला वाचवलं असतं तर त्याचं काय बिघडलं असतं ?, मी हेअरफोन्सवर गाणी ऐकत होते, नेमकं हात झटकला आणि लोकल आली, त्यामुळे माझा तोल गेला. मी खाली पडले खऱी पण माझा हात एका प्रवाशाच्या हातात आला म्हणून वाचले असा दावाही पूजाने केला.
या सगळ्या प्रकारानंतर अखेर रेल्वे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. रेल्वे अधिनियम 156 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानुसार तिला 500 रुपयांचा दंड किंवा 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आम्ही तिच्या घरी जाऊन आलो तर ती घराला ताळे लावलेले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेपीएस यादव यांनी दिली.
पूजा भोसले ही सध्या फरार असून तिचा फोनही बंद आहे. रेल्वे पोलिसांकडून तिचा कसून शोध घेत आहे.
==============================================================
VIDEO: हाच तो लोकलच्या दारातून पडतानाचा व्हिडिओ