पोलिसांची मोठी कारवाई, भीम आर्मीचे 400 कार्यकर्ते ताब्यात

पोलिसांची मोठी कारवाई, भीम आर्मीचे 400 कार्यकर्ते ताब्यात

चंद्रशेखर आझाद यांना पुणे-मुंबईत सभा घ्यायला पोलिसांनी मनाई केली आहे. आझाद यांनी विमानानं घरी जावं, अशी सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : भीम आर्मी या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मुंबईसह महाराष्ट्रात सभा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना मालाडच्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

चंद्रशेखर आझाद यांना पुणे-मुंबईत सभा घ्यायला पोलिसांनी मनाई केली आहे. आझाद यांनी विमानानं घरी जावं, अशी सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आझाद यांना विमानात बसवून देतील, असं स्पष्ट करण्यात आलं. पोलिसांच्या या भूमिकेवर आझाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी कुठे केली कारवाई?

भीम आर्मीकडून आज वरळीच्या जांबोरी मैदानात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याआधी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेले कार्यकर्ते दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समता नगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत.

मनाली हॉटेल तसंच वरळी स्टेशन आणि आसपासच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. भीम आर्मीचे मुंबई शहरप्रमुख सुनील गायकवाड, मराठवाडा विभागप्रमुख बलराज दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख अॅड. सचिन पट्टेबहादूर, अॅड. अखिल शाक्य यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातल्या कार्यक्रमावरही बंदी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चंद्रशेखर आझाद यांचा विद्यार्थ्यांशी होणारा संवादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 30 डिसेंबरच्या त्यांच्या सभेसाठीही परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र कार्यक्रमाला परवानगी नाकारली तरी अनिकेत कँटीनला कार्यक्रम होणारच, असं भीम आर्मीचे दत्ता पोळ यांनी म्हटलं आहे.

VIDEO: नागपुरात दोन घरांना भीषण आग, नवरा-बायकोचा होरपळून मृत्यू

First published: December 29, 2018, 1:49 PM IST

ताज्या बातम्या