Corona चे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना कोरोना अनुभव, पोलीस अॅम्ब्युलन्समधून नेत आहेत रुग्णालयात : राज्य सरकार कोरोनापासून नागरिकांचा कसा बचाव करता येईल यासाठी विविध प्रयत्न करताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन किंवा ब्रेक द चेन अंतर्गतचे कडक निर्बंध सर्वकाही नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू आहे. पण नागरिकच बेजबाबदारपणे वागत असतील तर त्यांचे काय करायचे. अशा बेजबाबदार नागरिकांना मुंबईतील वसई परिरात पोलिस एका अनोख्या पद्धतीनं चांगलाच इंगा दाखवत आहे.
(वाचा-CM Mamata Banerjee यांच्या घरात दुख:द घटना, कोरोनामुळे लहान भावाचे निधन)
मुंबईला लागून असलेल्या वसई पूर्व भागामध्ये रस्त्यावर होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. अशा नियम मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. याठिकाणी जो व्यक्ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम मोडत असेल अशा नागरिकांना पोलिस पकडत आहे. म्हणजेच एका दुचाकीवर दोघे किंवा कारमध्ये दोनपेक्षा अधिक लोक असतील तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले जातात. अशांना पकडून पोलिस बळजबरी अॅम्ब्युलन्समध्ये बसवून रुग्णालयात नेत आहेत. त्याठिकाणी अशा नियम मोडणाऱ्यांना बसवून ठेवलं जात आहे.
वसई : कोरोनामध्ये वाहतुकीचे नियम तोडले तर अशीच होईल अवस्था, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी कसं आणलय वठणीवर... pic.twitter.com/9vW4eP1lFk
— News18Lokmat (@News18lokmat) May 15, 2021
रस्त्यावर फिरताना जर कोरोनाचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही, तर कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळं जर अशाने कोरोना झाला तर अशाच प्राकरे अॅम्ब्युलन्समध्ये बसून रुग्णालयात जावं लागेल असा संदेश पोलिस देत आहेत. हा अनुभव जर घ्यायचा नसेल तर कोरोनाचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा असं पोलिस सांगत आहे. पोलिसांनी वसई येथील अग्रवाल सर्कल इथं जवळपास 25 हून अधिक जणांवर ही कारवाई केली आहे. लोकांना धडा शिकवण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
(वाचा-कोरोनाबाधितांना दारुचा काढा, अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरचा प्रताप)
कोरोनाच्या काळात सामान्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पोलिस रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. पण बेजबाबदार नागरिकांमुळं सर्वांनाच धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं वसईतील पोलिसांनी शोधलेली ही अनोखी शक्कल एकदम भन्नाट असून, नागरिकांना यामुळं परिस्थितीचं गांभीर्य समजत आहे. त्यामुळं लक्षात घ्या रस्त्यावर फिरताना कोरोनाचे नियम मोडत असाल तर तुम्हाला कोरोना झाल्यानंतर कसे वातावरण असते याचा अनुभव पोलिस आधीच देतील. तेव्हा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus cases